पदार्पणात शतकाचा पराक्रम; इंग्लंड ५ बाद २८८; अश्विनचे ७५ धावांत ४ बळी

किटन जेनिंग्सने खातेसुद्धा उघडले नव्हते. उमेश यादवच्या चेंडूवर त्याचा गलीमध्ये एकहाती झेल टिपण्यात करुण नायर अपयशी ठरला. पदार्पणाच्या कसोटीत शून्यावर बचावलेल्या किटनने मग पदार्पणातच शतकी खेळी साकारून वडिलांना सलामी दिली. कारण अशाच एका शून्याने किटनला आयुष्यभराला पुरेल, असा धडा शिकवला होता. शून्यातून विश्व उभारणाऱ्या किटनच्या ११२ धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ५ बाद २८८ अशी सावध आणि समाधानकारक मजल मारली.

किटन त्या वेळी जेमतेम नऊ-दहा वर्षांचा होता. दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न अधुरे राहिलेले त्याचे वडील रे जेनिंग्स त्याचा सराव घेत होते. स्थानिक क्रिकेटसोबतच प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत असणाऱ्या रे यांनी मुलगा किटनचा पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरसुद्धा तो बाद झाला. तेव्हा वडील भलतेच चिडले. तू पुढील चेंडूवर बाद झालास, तर आपण सराव थांबवून घरी जाऊ, अशा शब्दांत त्यांनी मुलाला खडसावले. परंतु तिसऱ्या चेंडूवर किटन पुन्हा बाद झाला आणि वडिलांचा पारा आणखी चढला. क्षणार्धात वडिलांनी बॅग उचलली आणि ते निघून गेले. त्या दिवसापासून किटन वडिलांना ‘कोच’ (प्रशिक्षक) या नावाने हाक मारतो. ‘डॅड’ हे शब्द अखेरचे केव्हा उच्चारले, हे त्याला मुळीच आठवत नाही. परंतु  सलामीवीर हसीब हमीदला दुखापत झाल्यामुळे किटनचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला. गुरुवारी पहाटे ५ वाजता तो उठला. त्या वेळी देशाकडून खेळण्याची संधी हुकणार तर नाही ना? असे विचार त्याच्या मनात दाटून आले. पण स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान दिवसअखेर त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते. वानखेडे स्टेडियमवर भारतीय फिरकीची तमा न बाळगता तो तब्बल साडेचार तास खेळपट्टीवर उभा राहिला आणि २१९ चेंडूंत १३ चौकारांसह त्याने आपली खेळी साकारली.

किटनचे वडील रे जेनिंग्स हे आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रशिक्षक. त्यांच्यासोबत तो काही वर्षांपूर्वी भारतात आला होता. त्या वेळी भारतीय वातावरण आणि खेळपट्टय़ा यांचे धडे त्याने वडिलांकडून घेतले. याचेच फलित किटनच्या पहिल्यावहिल्या लढतीमधील शतकातून दिसून आले. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो इंग्लंडचा १९वा खेळाडू ठरला. किटन हा जन्माने दक्षिण आफ्रिकेचा. पण इंग्लंडकडून खेळण्याचा त्याचा निर्णय सार्थकी लागला.

पहिल्या सामन्याचे दडपण झुगारत किटनने जयंत यादवला रीव्हर्स स्वीपद्वारे चौकार खेचत शतक पूर्ण केले. त्याच्या प्रयत्नांना वानखेडेच्या दर्दी क्रिकेटरसिकांनी मनापासून दाद दिली. शतक पूर्ण झाल्यावरही संयमाने किटन आगेकूच करीत होता. मात्र रविचंद्रन अश्विनने त्याच्या संस्मरणीय खेळीला पूर्णविराम दिला. डीप गलीच्या ठिकाणी चेतेश्वर पुजाराने त्याचा सुरेख झेल टिपला. किटनला नशिबाचीही छान साथ या खेळीत मिळाली.

अश्विनची प्रभावी फिरकी

रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी फिरकीच्या बळावर भारताने इंग्लंडला नियंत्रणात ठेवले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर भारतात खेळण्याचा दांडगा अनुभव गाठीशी असणारा संघनायक अ‍ॅलिस्टर कुक आणि जेनिंग्स यांनी ९९ धावांची दमदार सलामी दिली. २६व्या षटकात रवींद्र जडेजाकडे विराट कोहलीने चेंडू दिला आणि भारताला पहिले यश मिळाले. कुक ४६ धावांवर माघारी परतला. पुढे जाऊन खेळण्याचा त्याचा प्रयत्न पार्थिव पटेलने यष्टिचीत करून हाणून पाडला. मग जो रूट (२१) फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर जेनिंग्स आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. अश्विनचे ७१वे षटक महत्त्वाचे ठरले. त्याने दुसऱ्या चेंडूवर मोईनला (५०) आणि चौथ्या चेंडूवर किटनला तंबूची वाट दाखवली. जॉनी बेअरस्टोसुद्धा फारसा प्रभाव पाडू शकला नाही. खेळ थांबला तेव्हा बेन स्टोक्स २५ आणि जोस बटलर १८ धावांवर खेळत होते.

रिव्हर्स स्वीपची आठ महिन्यांपासून तयारी

पदार्पणात ९६ धावांवर असताना किटन जेनिंग्सने रिव्हर्स स्वीपचा जोखमीचा फटका मारून पहिलेवहिले शतक पूर्ण केले. याबाबत विचारल्यावर जेनिंग्स म्हणाला की, ‘रिव्हर्स स्वीप हा जोखीमभरा फटका आहे. कारण हा फटका खेळताना तुमचा झेल स्लीपमध्ये जाऊ शकतो. पण ९६ धावांवर असताना रिव्हर्स स्वीप खेळताना मला पूर्णपणे विश्वास होता. कारण गेल्या आठ महिन्यांपासून मी रिव्हर्स स्वीपचा सराव करत होतो.’

धावफलक

  • इंग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅलिस्टर कुक यष्टिचीत पटेल गो. जडेजा ४६, किटन जेनिंग्स झे. पुजारा गो. अश्विन ११२, जो रूट झे. कोहली गो. अश्विन २१, मोईन अली झे. नायर गो. अश्विन ५०, जॉनी बेअरस्टो झे. उमेश यादव गो. अश्विन १४, बेन स्टोक्स खेळत आहे २५, जोस बटलर खेळत आहे १८, अवांतर २ (लेगबाइज १, नोबॉल १), एकूण ९४ षटकांत ५ बाद २८८
  • बाद क्रम : १-९९, २-१३६, ३-२३०, ४-२३०, ५-२४९
  • गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ११-०-३८-०, उमेश यादव १०-२-३६-०, रविचंद्रन अश्विन ३०-३-७५-४, जयंत यादव २२-३-७८-०, रवींद्र जडेजा २१-३-६०-१.

 

काळ आला होता, पण..

मुंबई : मैदानावरील खेळाडूंना दुखापती होणे नवीन नाही. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिल ह्य़ूजच्या डोक्याला चेंडू लागून झालेल्या मृत्यूची आठवण झाली की अजूनही अंगावर शहारा येतो. वानखेडेवर सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावरील पंच आणि ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज पॉल रायफल यांना चेंडू लागला, ते जमिनीवर कोसळले आणि पुन्हा एकदा साऱ्यांच्या काळजात धस्स झाले. पण ही दुखापत गंभीर स्वरूपाची नव्हती. यावेळी काळ आला असला, तरी सारे काही थोडक्यातच निभावले आणि साऱ्यांनीच सुस्कारा सोडला. रायफल हे तंदुरुस्त असून शुक्रवारी ते मैदानात दिसतील, अशी आशा सूत्रांनी व्यक्त केली आहे.

आर. अश्विनच्या ४९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर किटन जेनिंग्सने स्क्वेअर लेगला चेंडू तटवत सहजपणे एक धाव घेतली. जास्त धावपळ कुणाचीच होत नव्हती. स्क्वेअर लेगला भुवनेश्वर कुमार क्षेत्ररक्षण करत होता. त्याने चेंडू अलगद टिपला आणि फेकला. हा चेंडू थेट पंच रायफल यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागला. त्यानंतर रायफल हे थेट मैदानावर कोसळले. त्यावेळी इंग्लंडच्या संघातील डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली. भारताचे खेळाडूही रायफल यांना सावरण्यासाठी सरसावले. रायफल यांच्यावर तात्पुरते उपचार करण्यात आले असले तरी त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना मैदानाबाहेर नेऊन उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या साऱ्यामध्ये तब्बल दहा मिनिटांचा खेळ वाया गेला. रायफल यांना मैदानाबाहेर नेल्यावर तिसरे पंच माराइस इरॅसमस यांनी मैदानावरील पंचाची भूमिका वठवली.

रायफल यांना वानखेडेवरून थेट ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. ही दुखापत गंभीर स्वरूपाची नसल्याचे समजल्यावर त्यांना स्टेडियमवर पाठवण्यात आले. स्टेडियमवर परतल्यावर त्यांनी विश्रांती घेणेच पसंत केले. पण शुक्रवारसाठी ते पंचगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

‘‘मैदानावरील पंच पॉल रायफल यांना भुवनेश्वर कुमारचा चेंडू डोक्याच्या मागच्या बाजूला लागला. त्यानंतर त्यांना थेट ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्या काही चाचण्या केल्या असून घाबरण्याचे काही कारण नाही. रायफल यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. ते पुन्हा या सामन्यासाठी सज्ज होतील अशी आशा आहे,’’ असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांनी सांगितले.

 

वानखेडेवरील रौप्यमहोत्सवी कसोटीत मुंबईकर खेळाडू नसल्याचे शल्य

मुंबई : भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या निमित्ताने वानखेडे स्टेडियमने आपले रौप्यमहोत्सव साजरे केले. मात्र या ऐतिहासिक टप्प्याप्रसंगी भारतीय संघात एकही मुंबईकर खेळाडू खेळत नसल्याचे शल्य येथील जाणत्या क्रिकेटरसिकांना बोचत होते. मुंबईकर अजिंक्य रहाणे या कसोटीत खेळणार होता. वानखेडेवरील ही त्याची पहिलीच कसोटी ठरणार होती. मात्र दुर्दैवाने सामन्याच्या पूर्वसंध्येला रहाणेच्या हाताला दुखापत झाली आणि त्याला कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.

वानखेडे स्टेडियमची निर्मिती झाली, त्या काळात भारतीय क्रिकेट संघात मुंबईकर खेळाडूंचा दबदबा असायचा. परंतु गेल्या काही वर्षांत एखाद-दुसरा खेळाडूच संघात स्थान मिळवताना दिसतो. याआधी वानखेडेवर शेवटचा झालेला सामना म्हणजे सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा. २०१३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या त्या ऐतिहासिक सामन्यात सचिन आणि रोहित असे दोन मुंबईकर भारतीय संघात होते.

२०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धच भारताची वानखेडेवर गाठ पडली होती. भारताने मानहानीकारक पराभव पत्करलेल्या त्या सामन्यात सचिन आणि झहीर भारतीय संघात होते. २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि २००६मध्ये इंग्लंडविरुद्ध वानखेडेवर भारतीय संघ खेळला, तेव्हा सचिन हा एकमेव मुंबईकर खेळाडू भारतीय संघात होता. १९७५ ते २०१३पर्यंतच्या वानखेडेच्या इतिहासात किमान एक तरी खेळाडू भारतीय संघात असायचा.