आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणाऱ्या धोनीने सर्व चाहत्यांना धक्का दिला. १५ ऑगस्टला संध्याकाळी धोनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. भारतीय संघातले धोनीचे चाहते त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही धोनी आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. आपल्या कारकिर्दीत धोनीने अनेक खेळाडूंना संधी दिल्या. महाराष्ट्राचा खेळाडू केदार जाधव हा देखील त्यापैकी एक.

अवश्य वाचा – IPL 2020 : १९ तारखेला टॉस दरम्यान भेटू, निवृत्ती घेतलेल्या धोनीला रोहित शर्माच्या हटके शुभेच्छा

धोनीने निवृत्ती स्विकारल्यानंतर केदार जाधवही भावूक झाला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक संदेश लिहीत त्याने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. “तुझ्यासोबत जेवढा वेळ घालवला त्यामधून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना तुझ्यामुळे प्रेरणा मिळाली आहे. तुझ्यासारखा मोठा भाऊ, मार्गदर्शक लाभणं हे मी माझं भाग्य समजतो. तुझ्यासोबत खेळायला मिळणं हा माझा सन्मान आहे”, अशा शब्दांत केदारने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघात उशीरा संधी मिळालेल्या केदार जाधवचा धोनीने मोठ्या खुबीने वापर केला. अनोख्या गोलंदाजी शैलीमुळे प्रसिद्ध असलेल्या केदारला गोलंदाजी करायला भाग पाडत धोनीने भारतीय संघाला महत्वाचे बळी मिळवून दिले.

अवश्य वाचा – धोनीच्या निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकची BCCI ला विनंती, 7 नंबरची जर्सी रिटायर करा !