आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य संघात निवड झालेल्या केदार जाधव याने केलेल्या नाबाद शतकामुळेच महाराष्ट्राने पंजाबविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात आव्हान कायम राखले. पहिल्या डावात १८१ धावांनी पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ३ बाद २५९ धावा अशी आश्वासक धावसंख्या रचली.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या २१० धावांना उत्तर देताना पंजाबने ८ बाद ३७० धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. आणखी २१ धावांची भर घातल्यानंतर त्यांचा डाव आटोपला. गीतांशु खेरा याने केलेल्या ५१ धावांचा वाटा होता. महाराष्ट्राकडून अनुपम संकलेचा व समाद फल्लाह यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचे चिराग खुराणा (१३) व विजय झोल (०) हे बाद झाले त्या वेळी त्यांची २ बाद २३ अशी स्थिती होती. त्यातच अंकित बावणे हा १२ धावांवर जखमी होऊन तंबूत परतल्यामुळे आणखीनच समस्या निर्माण झाली. तथापि हर्षद खडीवाले याच्या साथीत जाधवने संघाचा डाव सावरला. त्यांनी संघाचा डाव १११ धावांपर्यंत नेला. खडीवाले याने ७७ चेंडूंत १० चौकार व एक षटकारासह ६१ धावा टोलविल्या. त्याच्या जागी आलेल्या राहुल त्रिपाठी यानेही जाधवला चांगली साथ दिली. त्यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत अखेपर्यंत पंजाबच्या संमिश्र माऱ्यास तोंड दिले. त्यांनी ४५.२ षटकांत १४८ धावांची अखंडित भागीदारी केली. जाधव याने या रणजी मोसमातील पहिले शतक १२९ चेंडूंत पूर्ण केले. त्याने १३ चौकार व एक षटकारासह नाबाद १०९ धावा केल्या. त्रिपाठी याने सहा चौकार व एक षटकारासह नाबाद ५९ धावा टोलविल्या. दिवसअखेपर्यंत महाराष्ट्राने ७८ धावांचे अधिक्य मिळविले आहे. सामन्याचा बुधवारी शेवटचा दिवस असल्यामुळे सामन्यातील रंगत वाढली आहे.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव : २१०
पंजाब पहिला डाव : १०३ षटकांत सर्व बाद ३९१ (जीवनज्योतसिंग ६८, युवराजसिंग १३६, गुरकिरतसिंग ५७, गीतांशु ५१, हरभजनसिंग ३१, अनुपम संकलेचा ३/८८, समाद फल्लाह ३/७८, श्रीकांत मुंढे २/११२)
महाराष्ट्र दुसरा डाव : ७३ षटकांत ३ बाद २५९ (हर्षद खडीवाले ६१, केदार जाधव खेळत आहे १०९, राहुल त्रिपाठी खेळत आहे ५९)