रांचीच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने, पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य स्विकारलेल्या जवानांना अनोखी आदरांजली दिली. भारतीय खेळाडू आजच्या सामन्यात लष्कर घालत असलेल्या ‘कॅप्स’ (टोपी) घालून मैदानात उतरले आहेत. लष्कराकडून मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी मिळालेल्या महेंद्रसिंह धोनीने, आपल्या सर्व सहकाऱ्यांना या ‘आर्मी कॅप्स’ प्रदान केल्या. यावेळी मराठमोळ्या केदार जाधवने एका कृतीमधून सर्वांचं मन जिंकून घेतलं. धोनीने कॅप दिल्यानंतर केदारने लष्करी थाटात धोनीला कडक सॅल्युट केला. हा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला आहे.

बीसीसीआयने केलेल्या ट्विटमधील व्हिडीओ कॅप्शनमध्ये, ‘पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने आज भारतीय खेळाडू आर्मी कॅप घालून मैदानात उतरणार आहेत. भारतीयांनी शहीद जवनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि नातेवाईकांसाठीच्या मदतनिधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात देणगी द्यावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे’ असं म्हटलं आहे. या ट्विटच्या शेवटी बीसीसीआयने #JaiHind हा हॅशटॅगही वापरला आहे.

भारतीय संघातील सर्व खेळाडू रांची येथे ऑस्ट्रियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याचे मानधन पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर बोलताना ही माहिती दिली. नाणेफेक जिंकल्यानंतर समालोचक दिनेश कार्तीकने कोहलीला या ‘आर्मी कॅप’ बद्दल विचारले असता या कॅपच्या माध्यमातून आम्ही पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवनांना श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचे सांगितले. “संघातील सर्व खेळाडूंनी या सामन्याचे सर्व मानधन राष्ट्रीय सुरक्षा मदतनिधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं विराटने यावेळी बोलताना सांगितले. तसेच सर्वांनीच राष्ट्रीय सुरक्षा मदतनिधीसाठी योगदान द्यावे असं आवाहन विराटने भारतीयांना केले. ‘भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मी सर्व भारतीयांना अशी विनंती करेल की त्यांनी शक्य असेल तितकी मदत राष्ट्रीय सुरक्षा मदतनिधीसाठी करावी. शहिदांच्या कुटुंबियांसाठी तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शक्य तितकी मदत आपण सर्वांनी करायला हवी,’ असं विराटने यावेळी बोलताना सांगितले.