ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटीत ३१ धावांनी मात केल्यानंतर भारतीय संघ सध्या चांगल्याच जोशात आहे. १४ डिसेंबरपासून पर्थच्या मैदानावर या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मात्र या विजयामुळे भारतीय संघाने वाहवत जाऊ नये, याचसोबत या विजयानंतर भारतीय संघाने आपले पाय जमिनीवरच ठेवणं गरजेचं असल्याचं माजी प्रशिक्षक जॉन राईट यांनी म्हटलं आहे. ते मिड-डे वृत्तपत्राशी बोलत होते.

“भारतीय संघासाठी हा विजय खरच आशादायक आहे. ज्या पद्धतीने भारतीय संघ खेळला, ते पाहता भारत खरंच विजयाचा दावेदार होता. या सामन्यातून मिळालेला आत्मविश्वास, पुढच्या सामन्यात घेऊन मैदानात उतरा, चांगला खेळ करा. मात्र या विजयामुळे भारतीय संघाने वाहवत जाऊ नये, याचसोबत आपले पाय जमिनीवर ठेवणंही गरजेचं आहे.” जॉन राईट यांनी भारतीय संघाला सल्ला दिला.

अवश्य वाचा – IND vs AUS : पर्थवर ऑस्ट्रेलियाला हरवणं सोपं नाही – रिकी पाँटींग

जॉन राईट भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना अॅडलेडच्या मैदानावर भारताने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली अखेरचा कसोटी सामना जिंकला होता. यावेळी बोलत असताना राईट यांनी आपल्या कार्यकाळातील अॅडलेड विजयाच्या आठवणीही जागवल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने टी-२० मालिका गमावली आहे. त्यामुळे या कसोटी सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीयांचं वर्चस्व