इंग्लंडविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर माझ्यावर झालेल्या टीकेकडे दुर्लक्ष करीत केवळ खेळावरच लक्ष केंद्रित केल्यामुळेच मी हा सामना जिंकू शकलो, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सांगितले.
धोनी याने पहिल्या डावात द्विशतक करीत संघास मिळालेल्या दणदणीत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आणि टीकाकारांना गप्प केले. सामनाजिंकल्यानंतर धोनी म्हणाला, लोक किंवा प्रसारमाध्यमे काय म्हणतात याबाबत मी विचार केला नाही. मी वृत्तपत्रे फारशी वाचली नाहीत तसेच न्यूज चॅनेल्सही पाहण्याचे टाळले. माझ्यावर भरपूर टीका झाली, तरी मी माझी खेळायची शैली अजिबात बदलली नाही आणि हीच शैली मला मोठी खेळी रचण्यासाठी उपयुक्त ठरली.
मधल्या फळीतील फलंदाजांनी अतिशय भरीव कामगिरी करीत संघास मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळवून दिले. सचिन तेंडुलकर याचे शतक झाले नाही किंवा चेतेश्वर पुजारा याचे अर्धशतक झाले नाही तरीही त्यांनीही संघास पाचशे धावांचा पल्ला गाठण्यात मोलाचा वाटा उचलला. येथील वातावरणात गोलंदाजांची लवकर दमछाक होते. प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दमछाक करण्यासाठी आम्हास किमान दोन दिवस फलंदाजी करणे आवश्यक होते, सुदैवाने त्याप्रमाणेच घडत गेले. त्यामुळे आमची विजयाची पायाभरणी झाली. त्यानंतर मी जसे नियोजन केले तसेच घडत गेले. आमच्या गोलंदाजांनीही सर्वोत्तम कामगिरी केली. विशेषत: फिरकी गोलंदाजांनी तर कमालच केली. त्यांनाही विजयाचे श्रेय द्यावे लागेल असेही धोनी म्हणाला.
पहिल्या डावात मी फलंदाजीस आलो, त्या वेळी सामन्यात दोन्ही संघांना समान संधी होती. सुरुवातीस आक्रमक खेळ करीत गोलंदाजांची लय बिघडवून टाकण्याचे माझे ध्येय होते आणि त्यानुसार फटकेबाजी केली. शतक करण्याचे माझे ध्येय नव्हते. कारण मी अनेक वेळा नव्वदीत बाद झालो आहे. संघास भरीव धावसंख्या रचण्याचे माझे ध्येय होते. त्यामुळे शतक किंवा द्विशतक माझ्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नाही.