जपानच्या निशिकोरीला तिसऱ्याच फेरीत पराभवाचा धक्का

अमेरिकन खुली : टेनिस स्पर्धा

गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचसह रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांनी आपापले सामने सहज जिंकत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. मात्र जपानच्या सातव्या मानांकित केई निशिकोरीला तिसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

गेल्या पाचपैकी चार ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या जोकोव्हिच याला दुसऱ्या फेरीत खांद्याच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. मात्र तिसऱ्या फेरीत त्याने अमेरिकेच्या डेनिस कुडला याचा ६-३, ६-४, ६-२ असा पराभव करून विजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने कूच केली. आता रविवारी रंगणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीत सर्बियाच्या जोकोव्हिचची गाठ स्वित्झर्लंडच्या स्टॅनिस्लॉस वॉवरिंका याच्याशी पडेल. वॉवरिंकाने संघर्षपूर्ण लढतीत इटलीच्या पावलो लोरेंझी याच्यावर ६-४, ७-६ (११/९), ७-६ (७/४) अशी मात केली. जोकोव्हिचने वॉवरिंकाविरुद्धच्या सामन्यात १९-५ अशी सरशी साधल्यामुळे त्याचेच पारडे जड मानले जात आहे.

स्वित्झर्लंडच्या तिसऱ्या मानांकित फेडररने ब्रिटनच्या डॅन इव्हान्स याला ६-२, ६-२, ६-१ अशी अवघ्या ८० मिनिटांत धूळ चारली. दुसरा सामना पावसामुळे लांबल्यानंतर कमी वेळ विश्रांती मिळाली म्हणून इव्हान्सने आयोजकांवर टीका केली. फेडररसमोर पुढील फेरीत बेल्जियमच्या १५व्या मानांकित डेव्हिड गॉफिनचे आव्हान असेल.

अमेरिकेची सेरेना विल्यम्स कारकीर्दीतील २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी उत्सुक असून तिने ४४व्या क्रमवारीतील चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हा हिला ६-३, ६-२ असे सहज नमवले. अमेरिकन स्पर्धा सहा वेळा जिंकणाऱ्या सेरेनाला २०१४नंतर मात्र या स्पर्धेतवर तसेच २०१७च्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेनंतर एकाही ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. सेरेनाला पुढील फेरीत क्रोएशियाच्या २२व्या मानांकित पेट्रो मार्टिच हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

२०१४च्या उपविजेत्या केई निशिकोरीने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डे मिनोर याच्याविरुद्ध कडवी लढत दिली. मात्र जपानच्या सातव्या मानांकित निशिकोरीला २-६, ४-६, ६-२, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. महिलांमध्ये, फ्रेंच खुल्या स्पर्धेतील विजेती अ‍ॅशले बार्टी, चेक प्रजासत्ताकची तिसरी मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनीही आगेकूच केली. प्लिस्कोव्हाने टय़ुनिशियाच्या ओन्स जबेऊर हिचा ६-१, ४-६, ६-४ असा पाडाव केला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या मानांकित बार्टीने ग्रीसच्या ३०व्या मानांकित मारिया सक्कारी हिला ७-५, ६-३ अशी धूळ चारली. प्लिस्कोव्हाला पुढील फेरीत ब्रिटनच्या १६व्या मानांकित योहाना कोंटा तर बार्टीला १८व्या मानांकित वँग किआंग हिच्याशी लढत द्यावी लागेल.

बोपण्णा-डेनिस  दुसऱ्या फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोवालोव्ह यांनी पहिल्या फेरीचा अडथळा सहज पार करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. बोपण्णा-डेनिस यांनी पायरे-ह्य़ूजेस हेर्बर्ट आणि निकोलस माहूत या फ्रान्सच्या चौथ्या मानांकित जोडीला अवघ्या ५५ मिनिटांत ६-३, ६-१ असा घरचा रस्ता दाखवला. लिएंडर पेस आणि अर्जेटिनाचा गुइलेर्मो डुरान यांना पहिल्याच फेरीत सर्बियाच्या मायोमिर केकमॅनोव्हिच आणि नॉर्वेच्या कॅस्पर रुड यांच्याकडून ५-७, २-६ असा पराभव पत्करावा लागला. भारताचा दिविज शरण आणि त्याचा मोनॅकोचा साथीदार यांचे आव्हान गुरुवारी पहिल्या फेरीतच संपुष्टात आले होते.

खांद्याला वेदना कमी होतील, अशा प्रकारे मी खेळ केला. अचानक शरीराने साथ देणे कसे सोडले, हेच मला कळत नाही. पण गेल्या सामन्यापेक्षा माझ्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. गेल्या काही आठवडय़ांपासून मला हा त्रास जाणवत होता, मात्र मी वैद्यकीय अहवालाकडे सध्या दुर्लक्ष केले आह –  नोव्हाक जोकोव्हिच