आज, गुरुवारपासून हॅमिल्टन येथील मैदानावर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघांमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. दोन सामन्याच्या मालिकेतील हा पहिला कसोटी सामना आहे. सामना सुरु होण्यापूर्वी चाहत्यांना हळवं दृश्य पाहायला मिळालं. पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच विंडिजचा वेगवान गोलंदाज केमर रोच याच्या वडिलांच्या निधानाची बातमी आली. वडिलांच्या निधनाच्या वृत्तानंतरही रोचनं मनाला आवर घालत आणि दु:ख बाजूला सारत खेळण्याचा निर्णय घेतला. रोचच्या या निर्णयाचा आदर करत प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनीही त्याचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने देखील रोचला मिठी मारत त्याला धीर दिला.

विल्यमसनने मिठी मारत रोचला दिलेला धीर सध्या चर्चेचा विषय आहे. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनचं सर्वच स्थरावर कौतुक होत आहे. विल्यमसनची खिलाडूवृत्ती पाहून सर्वच क्रीडा चाहत्यांना अभिमान वाटत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विल्यमसनच्या कौतुकाचे पूर बांधले आहेत. केमर रोच याच्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू काळी पट्टी घालून मैदानात उतरले होते.

पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजी करत दिवसाखेर दोन गड्यांच्या मोबदल्यात २४३ धावा केल्या आहेत. विडिंजचा कर्णधार जेसन होल्डरनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिला कसोटी सामना खेळणारा विल यंग फक्त पाच धावांवर बाद झाला. त्यानंतर विल्यमसन आणि टॉम लाथम यांनी दुसऱ्या गड्यासाठी १५४ धावांची भागिदारी केली. सध्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ९७ आणि रॉस टेलर ३१ धावांवर खेळत आहेत. केमर रोच आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १-१ बळी मिळवला.