मागील दहा वर्षांत दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे यजमानपद सांभाळणाऱ्या केनियाने २०२३ मध्ये होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेच्या यजमानपदासाठी उत्सुकता दर्शवली आहे.

आतापर्यंत कोणत्याही आफ्रिकन राष्ट्राने अ‍ॅथलेटिक्समधील या सर्वोच्च प्रतिष्ठेच्या स्पध्रेचे यजमानपद सांभाळलेले नाही. मात्र केनियाचे क्रीडामंत्री हसन वॉरिया यांनी सांगितले की, ‘‘जुलै महिन्यात नैरोबी येथे झालेल्या १८ वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेत १३० देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पध्रेत केनियाने यजमानपदाच्या क्षमतेचा प्रत्यय दिला आहे. त्यामुळे आता मोठय़ा स्पध्रेच्या यजमानपदाची दावेदारी करण्यास कोणतीही हरकत नाही.’’

लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेत केनियाला दुसरे स्थान मिळाले. आपल्या देशाच्या खेळाडूंचे त्यांनी शानदार स्वागत केले. या वेळी वॉरिया यांनी म्हटले की, ‘‘२०१५ मध्ये बीजिंग येथे केनिया हे जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारे पहिले आफ्रिकन राष्ट्र ठरले होते. त्यामुळेच यजमानपदाचा हा मानसुद्धा मिळवण्याची आमची इच्छा आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘नैरोबी, मोम्बासा आणि एल्डोरेटे येथे तीन मोठे स्टेडियम आणि देशातील अन्य भागांमध्ये सात अतिरिक्त स्टेडियम बनवण्याची आमची योजना आहे.’’