केनियाच्या एलिऊद किपचोगेने मॅरेथॉनमध्ये दोन तास, एक मिनिट आणि ४० सेकंद असा विश्वविक्रम नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.

३३ वर्षीय माजी ऑलिम्पिक विजेत्या किपचोगेने डेनिस किमेटोने चार वर्षांपूर्वी नोंदवलेला दोन तास, दोन मिनिटे आणि ५७ सेकंद हा विश्वविक्रम मोडला. त्याने येथे झालेल्या चुरशीच्या शर्यतीत २५ किलोमीटर अंतरापासून सातत्यपूर्ण वेग ठेवला व ही कामगिरी केली. येथे त्याने पहिले पाच किलोमीटर अंतर १४ मिनिटे २४ सेकंदांत पार केले, तर १० किलोमीटरचा टप्पा त्याने २९ मिनिटे २१ सेकंदांत पूर्ण केला. त्याने ३५ किलोमीटर अंतर एक तास ४१ मिनिटांत पूर्ण केले होते.

किपचोगेने २०१३मध्ये हॅम्बर्ग येथील मॅरेथॉन शर्यतीद्वारे या लांब अंतराच्या धावण्याच्या स्पध्रेला गांभीर्याने प्रारंभ केला. त्याने पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत २००३मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतील सुवर्ण, तर २००७मध्ये रौप्यपदक मिळवले होते. याच क्रीडा प्रकारात त्याने २००४  व २००८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक जिंकले आहे. त्याने आतापर्यंत ११ वेळा विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यती जिंकल्या आहेत. त्यामध्ये त्याने रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धा तसेच हॅम्बर्ग, रॉटरडॅम व शिकागो मॅरेथॉन शर्यतींचा समावेश आहे.

मॅरेथॉनमधील यशाबद्दल माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. मी सर्व चाहते, प्रशिक्षक, पालक व देवाचे आभार मानत आहे. ही शर्यत जिंकण्याची मला खात्री होती फक्त विश्वविक्रम नोंदवला जाण्याबाबत मी साशंक होतो. नियोजनपूर्वक धावल्यामुळेच मी ही कामगिरी करू शकलो.   – एलिऊद किपचोगे