08 March 2021

News Flash

पुणे मॅरेथॉनवर केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व

केनियाचा शेतकरी लुका किपकेमोई याने इथिओपियाच्या खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जात पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीमधील पदार्पणातच विजेतेपद मिळविले. त्याने विक्रमी वेळेत ही शर्यत पार केली. महिला

| December 3, 2012 12:38 pm

केनियाचा शेतकरी लुका किपकेमोई याने इथिओपियाच्या खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जात पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीमधील पदार्पणातच विजेतेपद मिळविले. त्याने विक्रमी वेळेत ही शर्यत पार केली. महिला गटात त्याचीच सहकारी कुमुलू केविके हिने विक्रमी वेळ नोंदवत अर्धमॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळविले. भारतीय खेळाडूंच्या गटात गाझिलाल पटाले व कविता राऊत यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टने आयोजित केलेल्या या शर्यतीत केनियाच्या खेळाडूंनी पुरुष गटात पहिले दोन क्रमांक तर महिलांमध्ये पहिले तीन क्रमांक पटकावत निर्विवाद वर्चस्व गाजविले. लुका या ३२ वर्षीय खेळाडूने ४२ किलोमीटर १९५ मीटरचे अंतर दोन तास १३ मिनिटे तीन सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण केले. त्याचाच सहकारी सिमोन किरुई याने ही शर्यत दोन तास १४ मिनिटे नऊ सेकंदांत पार करीत उपविजेतेपद मिळविले. डॅनेल डेरेसी (इथिओपिया), गुडेटा गेमेचु (इथिओपिया), लिमो किमेली (केनिया) यांनी अनुक्रमे तीन ते पाच क्रमांक मिळविले.
भारतीय स्पर्धकांमध्ये गाझिलाल पटाले याने ही शर्यत दोन तास २९ मिनिटे ३३ सेकंदांत पार करीत प्रथम स्थान मिळविले. एकूण स्पर्धकांमध्ये त्याला १८वे स्थान मिळाले. भारतीय स्पर्धकांमध्ये शिवदानसिंग बार्ला, चंदरपाल फोगाट, आर. पद्मनाभन व मुकेशकुमार यांना अनुक्रमे दोन ते पाच क्रमांक मिळाले.
 महिलांच्या २१ किलोमीटर शर्यतीत केनियाच्या कुमुलु केविके, माजी विजेती मुटुने काटुंगे व मुस्योका हेलन निझेम्बी यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. केविकेने हे अंतर एक तास आठ मिनिटे १७ सेकंदांत पार करीत स्पर्धा विक्रम नोंदविला. तिने मुस्योका हिचा तीन वर्षांपूर्वीचा एक तास १० मिनिटे ११ सेकंदांचा विक्रम मोडला. भारतीय खेळाडूंमध्ये राष्ट्रकुल पदक विजेती खेळाडू कविता राऊत या सावरपाडा एक्सप्रेसने अजिंक्यपद मिळविले. नाशिकच्या आदिवासी भागातील या खेळाडूने २१ किलोमीटरचे अंतर एक तास १७ मिनिटे ३९ सेकंदांत पार केले. रोहिणी राऊत व काकेरी लालसाब यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला.
पुरुषांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीत इथिओपियाच्याच खेळाडूंनी पहिले तीन क्रमांक पटकावत निर्विवाद वर्चस्व गाजविले. मेलाकु बेलाचेवु याने ही शर्यत एक तास १ मिनिट ९ सेकंदांत जिंकली. त्याचे सहकारी रेवी तेकीये (एक तास १ मि.२४ सेकंद) व डेजेनी डेगेफा (एक तास २ मि.२५ सेकंद) यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळाले.
पुरुषांच्या मुख्य मॅरेथॉन शर्यतीत आफ्रिकन खेळाडू सुरुवातीपासूनच एका जथ्थ्यात धावतात व अन्य देशांच्या खेळाडूंना पुढे येण्याची संधी देत नाहीत असेच चित्र यंदाही पाहावयास मिळाले. खंडूजीबाबा चौकात सकाळी सात वाजता या शर्यतीस शानदार सोहळय़ात प्रारंभ झाला. तेथूनच केनिया व इथिओपियाच्या खेळाडूंनी सकाळच्या थंड हवामानाचा फायदा घेत जोरदार व सातत्यपूर्ण धाव घेण्यास सुरुवात केली. लुका किपकेमोई, सिमोन किरुई (केनिया), डॅनेल डेरेसी (इथिओपिया), गुडेटा गेमेचु (इथिओपिया), लिमो किमेली (केनिया) यांच्यासह १० ते १५ खेळाडू एकत्रित जथ्थ्यात धावत होते. १२ किलोमीटरचे अंतर त्यांनी ३७ मिनिटे ५३ सेकंदांत पार केले. २१ किलोमीटपर्यंतच्या अध्र्या टप्प्यातही अकरा खेळाडू संयुक्त आघाडीवर होते. २५व्या किलोमीटरला लुका, किरुई व डेरेसी यांनी वेग वाढवत अन्य खेळाडूंना मागे टाकले. ३४ किलोमीटपर्यंत या तीन खेळाडूंमध्येच चढाओढ दिसत होती. ३५व्या किलोमीटरला लुका याने चढावावर वेग वाढवत किरुई व डेरेसी यांच्यापेक्षा १०० मीटरची आघाडी घेतली. ही आघाडी त्याने शेवटपर्यंत टिकविली. मध्यम उंचीच्या या खेळाडूने सुरेख कौशल्य दाखविले. त्याने नेहरू स्टेडियमवरील अंतिम रेषा पूर्ण केल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा दिसला नाही.
पहिल्याच विजेतेपदामुळे सुखावलो -लुका
आजपर्यंत मी अनेक आंतरराष्ट्रीय शर्यतींमध्ये भाग घेतला आहे, मात्र दोन-तीन वेळा मला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. आज मात्र ३५व्या किलोमीटरला आघाडी घेतल्यानंतर पहिलेवहिले विजेतेपद मिळविण्याच्या निर्धाराने मी धावलो असे लुका याने सांगितले. तो मक्याची शेती करतो व हौस म्हणूनच मॅरेथॉन करतो. डेन्मार्क मॅरेथॉनमध्ये त्याने २ तास १० मिनिटे ही आपली सर्वोत्तम वेळ नोंदविली आहे.
जिंकण्याची खात्री होती -केविके
पुण्यातच प्रथमच भाग घेतला असला तरी येथील वातावरण शर्यतीसाठी अनुकूल असल्यामुळे ही शर्यत जिंकण्याची मला खात्री होती असे केनियाची १९ वर्षीय खेळाडू कुमुलु केविके हिने सांगितले.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 12:38 pm

Web Title: kenyans dominate pune international marathon
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाला पर्थ कसोटीत विजयासाठी विक्रमी आव्हान
2 आठवडय़ाची मुलाखत : ग्रँडमास्टर किताब मिळवण्याचे ध्येय -विक्रमादित्य
3 ला लीगा/इंग्लिश प्रीमिअर लीग : बार्सिलोनाचा दणक्यात विजय
Just Now!
X