*  भारताची पाकिस्तानवर सहा विकेट्सनी मात
*  भारताला सातवे स्थान
*  मिताली राजची शतकी खेळी
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा

यजमान असूनही साखळी गटातच गारद होण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली होती. मात्र सातव्या स्थानासाठीच्या लढतीत विजय मिळवत स्वाभिमान राखण्याची भारतीय संघाला संधी होती. कर्णधार मिताली राजच्या शतकी खेळीच्या जोरावर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सहा विकेट्सनी नमवत भारताने स्वाभिमान कायम राखला आहे.
१९३ धावांचे माफक लक्ष्य मिळालेल्या भारताची सुरुवात खराब झाली. पूनम राऊत क्वोनिता जलीलच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. यानंतर थिरुश कामिनी आणि मिताली राज यांनी संयमी भागीदारी करत डाव सावरला. २६ धावा करून कामिनी मारुफच्या गोलंदाजीवर बाद झाली. यानंतर हरमनप्रीत कौर आणि सुलक्षणा नाईक झटपट बाद झाल्याने मितालीवरील दडपण वाढले. मात्र तिने संयमी खेळी करत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिने १४१ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०३ धावांची खेळी केली. मितालीने पाचव्या विकेटसाठी रीमा मल्होत्रासह ८७ धावा जोडल्या.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पाकिस्तानचा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. झुलन गोस्वामीने नहिदा खानला बाद केले तर सिद्रा अमीन धावबाद झाली. नईन अबिदीने ५८ धावांची खेळी करत डाव सावरला.
स्पर्धेत आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या बिसमाह माहरुफला निरंजनाने बाद केले. अबिदी बाद झाल्यानंतर निदा दारने सामन्याची सूत्रे हाती घेतली. तिने ७ चौकारांसह नाबाद ६८ धावांची खेळी करत पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. पाकिस्तानने १९२ धावांची मजल मारली. भारतातर्फे नागाराजन निरंजनाने सर्वाधिक ३ बळी टिपले. झुलन गोस्वामीने १० षटकांत अवघ्या १७ धावा देत २ बळी घेतले.
या विजयासह भारताने विश्वचषकात सातवे स्थान मिळवले आहे. शतकवीर मितालीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सलामीच्या लढतीत वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला नंतरच्या दोन लढतीत इंग्लंड आणि श्रीलंकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.