भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. या लाटेत आयपीएलचा १४वा हंगामही खेळवण्यात येत होता, मात्र बायो बबलचा फुगा फुटल्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचा हा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावा लागला. खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करता, बीसीसीआयच्या या निर्णयाचे अनेक माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले. ज्या परिस्थितीत भारतातील लोक करोनाशी झुंज देत आहेत, अशात आयपीएल खेळवणे चुकीचे होते, अशी मतेही समोर आली.

मात्र इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि फलंदाज केव्हिन पीटरसनने यासंदर्भात बीसीसीआयचे समर्थन केले आहे. ”अशा कठीण परिस्थितीत भारतात आयपीएल सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य होता. या टी-२० लीगद्वारे काही तास लोकांचे मनोरंजन होत होते आणि हा एक दिनक्रम होता”, असे पीटरसनने सांगितले.

काय म्हणाला पीटरसन?

पीटरसनने एका वृत्तसंस्थेत लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे, “करोनामुळे लोकांची अवस्था वाईट असताना आयपीएल खेळवण्याचा निर्णय चुकीचा होता, या मताच्या लोकांशी मी सहमत नाही. माझा विश्वास आहे, की स्पर्धा सुरू ठेवणे ही भारतासाठी एक सकारात्मक गोष्ट होती. देशाची परिस्थिती चांगली नाही, परंतु दररोज ४-६ तास करमणूक होणे, ही एक सकारात्मक बाब आहे. आम्ही संपूर्ण भारतभर एक कार्यक्रम करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या मते प्रत्येक खेळाडूने दिलेले पॅकेज चांगले होते, विकेट संथ होती, पण क्रिकेट मजेदार होते.”

करोना विषाणूमुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यानंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.