खेलरत्न पुरस्कार विजेत्या साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार देता येणार नाही, असा निर्णय शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतला. त्यामुळे २७ अर्जुन पुरस्कार विजेत्यांसह प्रथमच पाच जणांची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

गेल्या आठवडय़ात निवृत्त न्यायमूर्ती मुकुं दकम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने २९ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. या यादीत रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी आणि २०१७ची वेटलिफ्टिंगमधील विश्वविजेती मीराबाई यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांच्या अर्जुन पुरस्काराबाबतचा निर्णय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना घ्यायचा होता. परंतु देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून गणला जाणारा खेलरत्न पुरस्कार या दोघींना आधीच मिळाला आहे. त्यामुळे हा पुरस्कार देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगट, पॅरालिम्पिकपटू मरियप्पन थांगावेलू, हॉकीपटू राणी रामपाल आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांची नावे क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कारासाठी निश्चित केली आहेत. २०१६ मध्ये चौघांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच पाच जणांना खेलरत्न दिला जाणार आहे. २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत दिमाखदारी कामगिरी केल्याबद्दल अर्जुन पुरस्कार पटकावणाऱ्या मनिकाची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खो-खोपटू सारिका काळेचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

करोनाच्या साथीमुळे यंदा प्रथमच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा वितरण होणार आहे. दर वर्षी २९ ऑगस्टला महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती भवनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.

२२ वर्षांनी खो-खोकरिता अर्जुन पुरस्कार

कर्नाटकच्या एन. शोभा यांच्यानंतर तब्बल २२ वर्षांनी महाराष्ट्राच्या सारिका काळेने खो-खो क्रीडा प्रकारासाठीचे अर्जुन पुरस्काराचे दार खुले केले आहे. १९७० ते १९९८ या कालावधीत आतापर्यंत १३ खो-खोपटूंनी हा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या तीन वर्षांत दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. या पाश्र्वभूमीवर अर्जुन पुरस्कारासाठी खो-खोपटूंचा विचार करावा, असा पाठपुरावा भारतीय खो-खो महासंघाकडून करण्यात आला होता.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा

*  खेलरत्न पुरस्कार (५) : रोहित शर्मा, विनेश फोगट, मरियप्पन थांगावेलू, राणी रामपाल, मनिका बात्रा.

*  अर्जुन पुरस्कार (२९) : इशांत शर्मा, चिराग शेट्टी, सात्विकसाइराज रंकीरेड्डी, अतानू दास, दीपक हुडा, दीपिका ठाकूर, दिविज शरण, आिकाशदीप सिंग, लोवलिना बोरगोहिन, मनू भाकर, सौरभ चौधरी, मनीष कौशिक, संदेश झिंगण, दत्तू भोकनळ, राहुल आवारे, द्युती चंद, दीप्ती शर्मा, शिवा केशवन, मधुरिका पाटकर, मनीष नरवाल, संदीप चौधरी, सुयश जाधव, विशेष भार्गुवंशी, अजय सावंत, आदिती अशोक, सारिका काळे, दिव्या काकरण.

*  द्रोणाचार्य पुरस्कार (१३) :  जीवनगौरव : धर्मेद्र तिवारी, पुरुषोत्तम राय, शिव सिंग, रोमेश पथाणिया, किशन कुमार हुडा, विजय भालचंद्र मुनिशवार, नरेश कुमार, ओम प्रकाश दहिया. नियमित : ज्युड फेलिक्स सॅबास्टियन, योगेश मालविया, जसपाल राणा, कुलदीप कुमार हांडू, गौरव खन्ना

*  ध्यानचंद पुरस्कार (१५) : कुलदीप सिंग भुल्लर, जिन्सी फिलिप्स, प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे, एन. उषा, लाखा सिंग, सुखविंदर सिंग संधू, अजित सिंग, मनप्रीत सिंग, जे. रंजित कुमार, सत्यप्रकाश तिवारी, मनजीत सिंग, सचिन नाग, नंदन बाळ, नेत्रपाल हुडा.

प्रतिक्रिया

करोना साथीच्या कठीण दिवसांमध्ये आशेचा किरण या अर्जुन पुरस्काराच्या रुपाने मिळाला. या पुरस्कारामुळे उमेद मिळाली असून भविष्यात देशासाठी आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

– चिराग शेट्टी, भारताचा बॅडमिंटनपटू

अर्जुन पुरस्कार घोषित झाल्याच्या क्षणाचा आनंद अजूनही अनुभवत आहे. माझ्यासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. माझा हा पहिलाच पुरस्कार असल्याने माझा आनंद सर्वाधिक आहे.

– सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी, भारताचा बॅडमिंटनपटू

माझ्यासाठी व कुटुंबियांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा मला मिळाल्याने तो मी कुटुंबिय, प्रशिक्षक, संघसहकारी, मित्रपरिवार यांना समर्पित करते. सुरुवातीपासून त्यांनी मला पाठिंबा दिला आहे.

– राणी रामपाल, भारताची हॉकी कर्णधार