खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने रविवारीदेखील अपेक्षेप्रमाणे अग्रस्थान कायम ठेवले. रविवारी महाराष्ट्राला एकूण चार  सुवर्णपदके मिळाली. सायकलिंगमध्ये पूजा दानोळे आणि मधुरा वायकर यांच्या रूपाने तर अ‍ॅथलेटिक्समध्ये अभय गुरव आणि पूर्वा सावंत यांनी सुवर्णपदके पटकवली. याबरोबरच महाराष्ट्राने पदकतालिकेत ११ सुवर्ण, १० रौप्य आणि १५ कांस्य यांच्यासह एकूण ३६ पदकांची कमाई केली आहे.

महाराष्ट्राला रविवारी सायकलिंगमधून (मुलींच्या गटात) दोन सुवर्णपदके मिळाली. पूजा दानोळेने (१७ वर्षांखालील) १५ किलोमीटर आणि मधुरा वायकरने (२१ वर्षांखालील) २० किलोमीटर गटात सुवर्णपदकांची कमाई केली. मधुराने २० किलोमीटर अंतराची शर्यत ३० मिनिटे ३६ सेकंद अशी वेळ देत जिंकली. त्यावेळी तिचा सायकलिंगचा वेग तब्बल ताशी ३९ प्रति किलोमीटर इतका होता. पूजा दानोळेने १० किलोमीटर अंतर ताशी ३७ किलोमीटर वेगाने २४ मिनिट १८ सेकंद वेळात पार करत सोनेरी कामगिरी केली.

अ‍ॅथलेटिक्समध्ये अभयने उंच उडी (२१ वर्षांखालील मुले) आणि पूर्वाने तिहेरी उडी (१७ वर्षांखालील मुली) या प्रकारात सोनेरी झेप घेतली. अभयने उंच उडीत २.०७ मीटर अशी कामगिरी करीत स्पर्धा विक्रमाची बरोबरी केली. महाराष्ट्राच्या आकाश सिंगने (१७ वर्षांखालील) मुलांमध्ये १०० मीटर धावण्यात रौप्यपदक मिळविले तर कीर्ती भोईटेने (२१ वर्षांखालील) मुलींमध्ये १०० मीटर धावण्यात कांस्यपदक मिळवले.

कबड्डी : युवक अंतिम फेरीत

महाराष्ट्राच्या (२१ वर्षांखालील) युवक कबड्डी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे आव्हान ३८-२० असे सहज संपुष्टात आणले. महाराष्ट्राच्या युवकांसमोर आता सुवर्णपदकासाठी हरियाणाचे आव्हान असेल. त्यांनी देखील रंगतदार झालेल्या सामन्यात चंडीगडचे आव्हान ३९-३९ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये ४४-४२ असे मोडून काढले. अन्य एका उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या (१७ वर्षांखालील) मुलांना मात्र स्पर्धेत वर्चस्व राखल्यानंतरही अखेरीस राजस्थानकडून ५१-५५ असा पराभव पत्करावा लागला. युवक कबड्डी गटाच्या लढतीत पंकज मोहितेचा व्यावसायिक अनुभव, अस्लम इनामदारच्या आक्रमक चढाया आणि सौरभ पाटीलच्या नेतृत्वाला बचावाची मिळालेली भक्कम तटबंदी महाराष्ट्राच्या वर्चस्वाचे वैशिष्टय़ ठरले.

जिम्नॅस्टिक्स : ओंकारला रौप्यपदक

यंदा जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सोनेरी कामगिरी केली आहे. पुरुषांच्या (२१ वर्षांखालील) कलात्मक जिम्नॅस्टिक्स प्रकारात ओंकार शिंदेने रौप्यपदक मिळवले. जिम्नॅस्टिक्समध्ये आतापर्यंत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुयश मिळवलेले आहे.

तिरंदाजी : टिशा, सचिन अंतिम फेरीत

* राज्याच्या तिरंदाजांनी आपले सातत्य कायम राखले. ऑलिम्पिक रिकव्‍‌र्ह प्रकारात महाराष्ट्राच्या टिशा संचेती आणि सचिन वेदवान यांनी (२१ वर्षांखालील) अंतिम फेरी गाठली.

* कंपाऊंड प्रकारातील गतविजेती ईशा पवारला पराभव पत्करावा लागला. मुलींमध्ये साक्षी तोटे तर पार्थ साळुंके, मयूर रोकडे यांना पराभूत व्हावे लागले. आता ईशा, साक्षी, पार्थ, मयूर हे कांस्यपदकासाठी खेळतील.