पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वांकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानल्या जाणाऱ्या खेलो इंडिया या मोहिमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठी देशातील शालेय पातळीवरील खेळाडूंमधील गुणवत्ता हेरुन त्यांना पुढे प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती. Star Sports या अग्रगण्य क्रीडा वाहिनीने केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत सर्व सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं होतं.

BARC या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनूसार, आठवडाभर खेलो इंडिया अंतर्गत प्रक्षेपित करण्यात आलेल्या सामन्यांना देशभरातून अंदाजे १० कोटी २० लाख लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे. BARC ही संस्था टेलिव्हीजन वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येचे तपशील ठेवत असते. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत पहिल्यांदा शालेय सामन्यांचं मोठ्या प्रमाणात खासगी क्रीडा वाहिनीवर प्रक्षेपण करण्यात आलं होतं. खेलो इंडियाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनीही आनंद व्यक्त केला.

“ज्या पद्धतीने खेलो इंडियातील सामन्यांना भारतभर प्रतिसाद मिळाला आहे तो वाखणण्याजोगा आहे. ज्या पद्धतीने लोकांनी या सामन्यांना आपली पसंती दर्शवली आहे, हे पाहता आगामी काळात भारत क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवेल यात काहीच शंका नाही. अशाप्रकारच्या क्रीडामोहीमेतून भारताचा क्रीडाक्षेत्रात दबदबा निर्माण होईल.” येणाऱ्या काही वर्षांमध्ये या स्पर्धांच्या माध्यमातून पुढे आलेले खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करुन पदकांची लयलूट करतील अशी आशाही राठोड यांनी व्यक्त केली.