बालेवाडीत ‘खेलो इंडिया’च्या दुसऱ्या पर्वाला शानदार सुरुवात

मुंबई : बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत बुधवारपासून ‘खेलो इंडिया’च्या दुसऱ्या पर्वाला शानदार सुरुवात झाली. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खेलो इंडियाचे उद्घाटन करण्यात आले.

पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडंनी पदकांची लयलूट करण्यात सुरुवात केली. महाराष्ट्राच्या शुभम कोळेकरने वेटलिफ्टिंगमध्ये तसेच प्रवीण पाटील याने कुस्तीमध्ये सोनेरी यश संपादन केले.

वेटलिफ्टिंग : शुभम कोळेकरला सुवर्ण

वेटलिफ्टिंगमधील १७ वर्षांखालील गटातील महाराष्ट्राच्या अभिषेक महाजन (५५ किलो) याने सोनेरी वेध घेतला. त्याने स्नॅचमध्ये ९० किलो तर क्लीन व जर्कमध्ये १२१ किलो असे एकूण २११ किलो वजन उचलले. छत्तीसगडच्या सुभाष लहारे याने २०५ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. गोलम टिकू याने २०१ किलो वजनासह कांस्यपदक जिंकले. २१ वर्षांखालील गटात शुभम कोळेकर याने ५५ किलो गटात क्लीन व जर्कमध्ये विक्रम प्रस्थापित केला. त्याने १३९ किलो वजन उचलत स्वत:चाच १३८ किलो वजनाचा विक्रम मोडीत काढला आणि एकूण २३६ किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली. प्रशांत कोळी याने कांस्यपदकाची कमाई करत महाराष्ट्राला आणखी एक पदक मिळवून दिले.

कुस्ती : प्रवीण पाटीलचे सोनेरी यश

कुस्तीत महाराष्ट्राच्या प्रवीण पाटील याने सोनेरी कामगिरी केली. ग्रीको रोमन प्रकाराच्या लढतींमध्ये महाराष्ट्राने एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदके मिळवली. प्रवीणने १७ वर्षांखालील गटाच्या ५५ किलो वजनी विभागात हे यश मिळविताना हरयाणाच्या ललितकुमार याच्यावर सहज मात केली. ज्ञानेश्वर देसाई व पृथ्वीराज खडके यांना रौप्यपदक तर अमृत रेडेकर व कुंदनकुमार यांनी ब्राँझपदक मिळाले. ज्ञानेश्वर देसाई याने ५१ किलो गटाच्या अंतिम मणिपूरच्या खुंदोमसिंग लोयनगम्बा याच्याकडून २-४ असा पराभव स्वीकारल्याने त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. पृथ्वीराज खडके याला ९२ किलो गटाच्या अंतिम फेरीत दिल्लीच्या रमेश पुनिया याच्याविरुद्ध फारसा प्रभाव दाखविता आला नाही. रमेशने निर्विवाद वर्चस्व गाजवत पृथ्वीराजला गारद केले. महाराष्ट्राच्या अमृत रेडेकर (६५ किलो) याने १७ वर्षांखालील गटात कांस्यपदक मिळवले.

जिम्नॅस्टिक्स : श्रेयाला रौप्य; क्रिशाला कांस्य

महाराष्ट्राच्या श्रेया भंगाळे हिने जिम्नॅस्टिक्समधील वैयक्तिक सर्वसाधारण अ‍ॅपेरेटस प्रकारात रौप्यपदक मिळविले. तिची सहकारी क्रिशा छेडा हिला याच प्रकारात कांस्यपदक मिळाले. जम्मू आणि काश्मीरच्या बावलीन कौर हिने ४३.४० गुणांची कमाई करत सोनेरी कामगिरी केली. श्रेया हिला ३९.७० गुण मिळाले. श्रेया ही ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया प्रशालेत शिकत असून तिचे हे पहिलेच पदक आहे. क्रिशा ही मुंबईतील जयहिंद महाविद्यालयात शिकत असून ती प्रीमिअर रिदमिक जिम्नॅस्टिक्स अकादमीत सराव करते. श्रेया म्हणाली की, ‘‘माझी ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. येथील वातावरण खरोखरीच सर्वाना भारावून टाकणारे आहे.’’

जागतिक स्पर्धेसाठी आल्याचा भास -सुशील

पुणे : उदयोन्मुख खेळाडूंचा अवर्णनीय उत्साह, स्पर्धेसाठी करण्यात आलेली तयारी पाहता, खेलो इंडिया महोत्सव म्हणजे जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याचाच भास मला होत आहे, असे ऑलिम्पिक रौप्य व कांस्यपदक विजेता मल्ल सुशीलकुमार याने सांगितले.

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा महोत्सवाला सुशील कुमारने भेट दिली. त्या वेळी सुशील कुमारने सांगितले की, ‘‘येथे आल्यानंतर मी खूप भारावून गेलो आहे. देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येथील उत्साहवर्धक वातावरण पाहता हा उद्देश निश्चित यशस्वी होणार आहे.’’

तो पुढे म्हणाला, ‘‘येथे आल्यानंतर नवोदित खेळाडूंशी संवाद साधताना खूप आनंद मिळतो. आमच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंपासून त्यांनी प्रेरणा घेऊन देशाचा नावलौकिक उंचावण्याची गरज आहे. या स्पर्धेतून भावी ऑलिम्पिक विजेते खेळाडू निर्माण होतील, अशी मला खात्री आहे. ऑलिम्पिक पदक मिळविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक खेळाडूने खूप मेहनत केली पाहिजे. त्यासाठी खूप कष्ट व त्याग करावा लागतो.’’

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीविषयी सुशीलने सांगितले की, ‘‘ऑलिम्पिक पदकाची हॅट्ट्रिक साधण्याचे माझे ध्येय आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचेच माझे ध्येय आहे. त्यादृष्टीने मी भरपूर सराव करत आहे. मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धाना सुरुवात होणार असून तिथूनच माझी खऱ्या अर्थाने ऑलिम्पिकसाठीची तयारी सुरू होणार आहे.’’