महाराष्ट्राच्या धावपटूंनी ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेतील गुरुवारचा दिवस गाजवला. अल्डेन नरोन्हा याने ११० मीटर अडथळा शर्यतीत २१ वर्षांखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक जिंकून शानदार कामगिरी केली. तेजस शिरसेने ११० मीटर अडथळा शर्यतीत तर मुलींच्या १०० मीटर अडथळा शर्यतील प्रांजली पाटील हिने रौप्यपदकाची कमाई केली.

अल्डेनने १४.१० सेकंद अशी वेळ देत केरळचा सी. मोहम्मद (१४.११ से.) आणि महाराष्ट्राचा अभिषेक उभे (१४.३२ से.) यांच्यावर मात केली. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत शिकणारा अल्डेन हा मुंबईत दयानंद शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. औरंगाबादजवळील देवगाव रंगारी येथील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या तेजसने रौप्यपदक पटकावले. मुलींमध्ये १७ वर्षांखालील गटात तमिळनाडूच्या थबिथा पी. एम. हिने १४.१४ सेकंदात अंतर पार करत सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राच्या प्रांजली पाटील (१४.४९ से.) हिने रौप्यपदकाची कमाई केली. प्रांजली ही मुंबई येथे वीरेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

रिलेमध्ये मुलींना दुहेरी मुकुट

४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षांखालील मुलींनी सुवर्णपदकाची कमाई केली. सुदेश्ना शिवणकर, हरिता भद्रा, आदिती परब, अवंतिका नरळे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींनी हे अंतर ४८.३१ सेकंदांत पार केले. केरळ (४८.६१ सेकंद) आणि तमिळनाडूने (५१.३६ सेकंद) अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.

रोझलिन लेव्हिस, सिद्धी हिरे, रश्मी शेरेगर, कीर्ती भोईटे या महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील मुलींच्या संघाने ४७.२२ सेकंदांत अंतर पार करत सुवर्णपदकावर आपले नाव निश्चित केले. शेवटच्या काही सेकंदांत दहिसरच्या व्हीपीएम मंडळाची धावपटू असलेल्या रश्मी शेरेगरने आपला वेग वाढवत केरळच्या खेळाडूला मागे टाकत महाराष्ट्राच्या सुवर्णपदकात मोलाची कामगिरी बजावली.

जलतरणात वेदांत, युगाची सोनेरी कामगिरी

वेदांत बापना व युगा बिरनाळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकून जलतरणात नेत्रदीपक यश संपादन केले. तसेच अनया वाला, ऋतुजा तळेगावकर, साहिल गनगोटे यांनी कांस्यपदकाची कमाई केली. मुंबईच्या १५ वर्षीय वेदांतने मुलांच्या १७ वर्षांखालील गटात १०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यत १ मिनिट ०.१६ सेकंदात जिंकली. पुण्याच्या युगा हिने अपेक्षेप्रमाणे २१ वर्षांखालील गटाच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. तिने ही शर्यत १ मिनिट ०८.४६ सेकंदात जिंकली.  मुलींच्या १७ वर्षांखालील गटात अनया वाला हिला ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. २१ वर्षांखालील मुलींच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत ऋतुजा तळेगावकर (४ मिनिटे ५०.८४ सेकंद) हिला कांस्यपदक मिळाले. मुलांमध्ये साहिलने ४०० मीटर वैयक्तिक मिडले शर्यतीत कांस्यपदक मिळविले.