खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लूट कायम ठेवली आहे. सोमवारी १६ सुवर्ण, १९ रौप्य आणि ३५ कांस्यपदकांसह भारताने एकूण पदकांचा आकडा ७० वर नेला आहे.

स्पर्धेत गेले दोन दिवस सायकलपटू पूजा दानोळेने गाजवले. रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस तिने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. पूजाने मुलींच्या (१७ वर्षांखालील) ३० किलोमीटर शर्यतीत ताशी ३५ किलोमीटर वेगाने सायकलिंग करताना ५५ मिनिट ४२.३२ सेकंदात ही शर्यत जिंकली. मुलांमधून (१७ वर्षांखालील) सिद्धेश पाटीलने कांस्यपदक मिळवले. मुलांच्या ५० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत सिद्धेशने १ तास ९ मिनीट ३६.४९ सेकंद या अंतरासह कांस्यपदक जिंकले.

दरम्यान, महाराष्ट्र सुरुवातीला १६ सुवर्णपदकांसह अव्वल स्थानी होता. मात्र हरयाणाने १७ सुवर्णपदके जिंकत अव्वल स्थान पटकवले. ते पाहता महाराष्ट्र आणि हरयाणा यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली आहे. महाराष्ट्राचे खेळाडू जिम्नॅस्टिक्स, तिरंदाजी, नेमबाजी, सायकलिंग, उंच उडी अशा प्रत्येक खेळात पदके मिळवत आहेत. जिम्नॅस्टिकपटू अस्मी बदाडेने स्पर्धेच्या सुरुवातीला चार सुवर्णपदके मिळवत महाराष्ट्राची सुरुवात चांगली केली.