महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जलतरण क्रीडाप्रकारात मंगळवारी सुवर्णजल्लोष साजरा केला. अपेक्षा फर्नाडिस, केनिशा गुप्ता आणि मिहीर आम्ब्रे यांनी आपापल्या शर्यती जिंकत महाराष्ट्राच्या सुवर्णयशात मोलाचा वाटा उचलला. वेटलिफ्टिंगमध्ये साताऱ्याच्या वैष्णवी पवार हिने सुवर्णपदक जिंकले.

अपेक्षाने मुलींच्या गटात २०० मीटर बटरफ्लाय शर्यत २ मिनिटे २१.५२ सेकंदात जिंकली. त्यानंतर तिने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातही ३४.५६ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक मिळवले. केनिशाने ५० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत २७.२९ सेकंद अशी वेळ नोंदवून विजेतेपद पटकावले. मुलांमध्ये मिहिरने ५० मीटर फ्रीस्टाइल शर्यत २३.६१ सेकंदात पार करून अव्वल क्रमांक पटकावला. वेटलिफ्टिंगमध्ये ८१ किलो वजनी गटात वैष्णवीने १३४ किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले. तिने स्नॅचमध्ये ६२ तर क्लिन आणि जर्क प्रकारात ७२ किलो वजन उचलले.

पूजा शेंडगे हिने केलेल्या एकमेव गोलाच्या बळावर महाराष्ट्राच्या मुलींनी मिझोरामचा १-० असा पाडाव करत २१ वर्षांखालील गटात कांस्यपदकाची कमाई केली. मिझोरामने महाराष्ट्र हॉकी संघाला कडवी लढत दिली. पूर्वार्धात गोलशून्यची बरोबरी असताना उत्तरार्धात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आक्रमक खेळावर भर दिला. त्याचाच फायदा उठवत पूजा हिने गोल लगावला. मिझोरामचा पेनल्टी कॉर्नर महाराष्ट्राची गोलरक्षक सुस्मिता पाटील हिने परतवून लावला.

टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या ध्रुव सुनिश व अथर्व शर्मा यांनी मुलांच्या २१ वर्षांखालील गटात हरयाणाच्या आकाश अहलावत आणि अमित बेनिवाल यांचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडवत कांस्यपदक पटकावले.