17 December 2017

News Flash

खिलाडी ७६

तो चाळिशीकडे झुकलाय, त्याचा धावांचा ओघ मंदावलाय, पायांच्या हालचाली धिम्या झाल्या आहेत, त्याचा त्रिफळाच

पी.टी.आय. कोलकाता | Updated: December 6, 2012 5:42 AM

*    भारताची ७ बाद २७३ अशी बिकट अवस्था
*    संयमी अर्धशतकी खेळी साकारत सचिनचे टीकाकारांना चोख उत्तर
*    गंभीरनेही झळकावले अर्धशतक
तो चाळिशीकडे झुकलाय, त्याचा धावांचा ओघ मंदावलाय, पायांच्या हालचाली धिम्या झाल्या आहेत, त्याचा त्रिफळाच उडतोय, मागील १५ डावांमध्ये त्याची धावांची सरासरी फारच कमी आहे.. अशा टीकाकारांच्या अनेक चर्चाना सचिन तेंडुलकरने आपल्या बॅटने पूर्णविराम दिला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या क्रिकेटरसिकांच्या साक्षीने सचिनने आपण फॉर्मात परतल्याची ग्वाही दिली. अपेक्षांचे प्रचंड दडपण झुगारत साकारलेली ७६ धावांची संयमी खेळी भारतासाठी महत्त्वाची ठरली. परंतु तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची इंग्लंडने ७ बाद २७३ अशी बिकट अवस्था केली.
गौतम गंभीरने झळकावलेल्या अर्धशतकानंतर भारताची आघाडीची फळी कोसळली. पण सचिन मोठी खेळी उभारण्याच्या इराद्यानेच मैदानावर उभा राहिला. १५५ चेंडूंचा सामना करीत त्याने १३ चौकारांसह आपली खेळी उभारली. सचिनने युवराजसोबत पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचली, हेच भारताच्या डावातील महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरले. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक मॅट प्रायरने सूर मारून सचिनचा झेल टिपला. त्यामुळे सचिनचे शतकाचे स्वप्न भंगले. परंतु सिडनी कसोटीनंतर सचिनला प्रथमच अर्धशतक झळकावता आले. वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनला चौकार ठोकून सचिनने हा टप्पा गाठला.
फलंदाजांसाठी अनुकूल ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर अँडरसनने टिच्चून गोलंदाजी केली. इंग्लिश गोलंदाजांनी पहिल्या दोन सत्रांमध्ये प्रत्येकी दोन बळी घेतले, तर चहापानानंतरच्या सत्रात तीन बळी घेतले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग (२३) यांनी ४७ धावांची दमदार सलामी नोंदवली. परंतु सेहवाग दुर्दैवीरीत्या धावचीत झाला, तर गंभीरला आपल्या चांगल्या खेळीचे शतकामध्ये रूपांतर करता आले नाही. गेली तीन वष्रे गंभीरला कसोटीमध्ये शतक साकारता आलेले नाही. पनेसारचा उंची दिलेला आणि अंगावर येणारा चेंडू कट करण्याच्या नादात स्लिपमध्ये जोनाथन ट्रॉटकडे झेल देऊन गंभीर माघारी परतला. डावखुरा फलंदाज गंभीरने १२ चौकारांसह १२४ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. त्यानंतर चेतेश्वर पुजाराचा फक्त १६ धावांवर मॉन्टी पनेसारने त्रिफळा उडविला. विराट कोहलीची मालिकेतील धावांची चणचण कायम राहिली. त्याला फक्त सहा धावाच काढता आल्या. ४ बाद १३६ अशा अवस्थेनंतर सचिनने युवराजच्या साथीने किल्ला लढविला.
अँडरसन (३/६८) याने भारताला दुसऱ्या नव्या चेंडूवर अधिक त्वेषाने सतावले. त्याच्या ऑफ-कटरवर आर. अश्विनचा त्रिफळा उडाला. खेळ थांबला तेव्हा कप्तान महेंद्रसिंग धोनी २२ धावांवर खेळत होता, तर झहीर खानने आपले खातेही उघडले नव्हते. ईडन गार्डन्सवर बुधवारी प्रथमच प्रकाशझोताचा कसोटी सामन्यासाठी उपयोग करण्यात आला. अखेरचा ४० मिनिटांचा खेळ कृत्रिम प्रकाशझोतामध्ये खेळविण्यात आला.    

अब तक ३४,०७४!
सचिन तेंडुलकरने बुधवारी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमधील ३४ हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. उपाहारानंतर मॉन्टी  पनेसारच्या गोलंदाजीवर सचिनने आपली वैयक्तिक दुसरी धाव घेत ३४ हजार धावांचा टप्पा गाठला. क्रिकेटच्या इतिहासात हा टप्पा गाठणारा तो एकमेव फलंदाज आहे. २३ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये  सचिनने १९३ कसोटी सामन्यांत १५,६३८ धावा, ४६३ एकदिवसीय सामन्यांत १८,४२६ धावा आणि एका ट्वेन्टी-२० सामन्यात १० धावा केल्या आहेत.

मुखर्जी हे ‘ईडनचे बॉस’ -धोनी
कोलकाता : गेल्या काही दिवसांपासून भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ईडन गार्डन्सचे क्युरेटर प्रबिर मुखर्जी यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगले असताना तिसऱ्या कसोटी सामन्याआधी दोघांनीही मतभेद मिटविण्याचे ठरवले. सलग तिसऱ्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ईडन गार्डन्सच्या पाटा खेळपट्टीवर आनंद व्यक्त करत धोनीने मुखर्जी यांना ‘ईडन गार्डन्सचे बॉस’ असे संबोधले. नाणेफेकीनंतर धोनीने मुखर्जी यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि नंतर दोघेही स्टेडियममध्ये निघून गेले. धोनी मुखर्जी यांना म्हणाला, ‘आपको कभी मैने बुरा बोला है दादा! आप तो यहाँ के बॉस हो’. सचिन तेंडुलकरचा ईडन गार्डन्सवरील अखेरचा सामना असल्याची शक्यता असल्यामुळे पहिल्या दिवशी जवळपास २० हजार चाहत्यांनी हजेरी लावली होती.    

झहीर खान आणि इशांत शर्मा रिव्हर्स स्विंग करण्यात पटाईत आहेत. ते या खेळपट्टीवर यशस्वी ठरल्यास इंग्लंडला टिकाव धरणे कठीण जाईल. ही खेळपट्टी सर्वासाठीच अनुकूल आहे. चेंडू छान बॅटवर येतो, कधी चेंडूला उंची लाभते, तर कधी तो खाली राहतो.
-गौतम गंभीर

धावफलक
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर झे. ट्रॉट गो. पनेसार ६०, वीरेंद्र सेहवाग धावचीत २३, चेतेश्वर पुजारा त्रिफळा गो. पनेसार १६, सचिन तेंडुलकर झे. प्रायर गो. अँडरसन ७६, विराट कोहली झे. स्वान गो. अँडरसन ६, युवराज सिंग झे. कुक गो. स्वान ३२, महेंद्रसिंग धोनी खेळत आहे २२, रविचंद्रन अश्विन त्रिफळा गो. अँडरसन २१, झहीर खान खेळत आहे ०, अवांतर (बाइज-५, लेगबाइज-११, नोबॉल-१) १७, एकूण ९० षटकांत ७ बाद २७३
बाद क्रम : १-४७, २-८८, ३-११७, ४-१३६, ५-२१५, ६-२३०, ७-२६८
गोलंदाजी : जेम्स अँडरसन २१-५-६८-३, स्टीव्ह फिन २०-२-६९-०, मॉन्टी पनेसार ३५-१२-७४-२, ग्रॅमी स्वान १४-१-४६-१.

First Published on December 6, 2012 5:42 am

Web Title: khiladi 76
टॅग Cricket,Sports