राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

अलोन पब्लिक स्कूल, छत्तीसगड येथे सुरू असलेल्या ५३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी गटविजेतेपद पटकावत दिमाखात उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी महाराष्ट्राच्या पुरुषांपुढे मध्य भारतचे, तर महिलांपुढे दिल्लीचे आव्हान असणार आहे.

पुरुषांच्या ‘अ’ गटातील तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा १९-३ असा एक डाव आणि १६ गुणांनी फडशा पाडला. महाराष्ट्रासाठी ऋषिकेश मुर्चावडेने आक्रमणात पाच गडी बाद केले. अक्षय गणपुले (३.१० मिनिट), प्रतीक वाईकर (२.५० मि.) यांनी त्याला संरक्षणात उत्तम साथ दिली.

साखळीतील अखेरच्या चौथ्या लढतीत महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा १३-२ असा एक डाव आणि ११ गुणांनी धुव्वा उडवला. महेश शिंदे (४ मि.) आणि अक्षय गणपुले (३ मि.) यांनी संरक्षणात, तर ऋषिकेश आणि सुरेश सावंत (प्रत्येकी ३ गडी) यांनी आक्रमणात महाराष्ट्रासाठी मोलाचे योगदान दिले.

महिलांच्या ‘अ’ गटातील तिसऱ्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने चंडीगडला १४-७ अशी एक डाव आणि ७ गुणांनी धूळ चारली. रेश्मा राठोड (३ मि. आणि ३ गडी) आणि रूपाली बडे (२.५० मि. आणि ३ गडी) यांनी महाराष्ट्रासाठी अष्टपैलू चमक दाखवली.

चौथ्या लढतीत महाराष्ट्राने मध्य भारतला २१-७ असे एक डाव आणि १४ गुणांनी पराभूत केले. कर्णधार अपेक्षा सुतार (३ मि. आणि ५ गडी), काजल भोर (४ गडी) आणि रेश्मा (३ गडी) यांनी महाराष्ट्रासाठी उत्कृष्ट खेळ केला.

विमानतळ प्राधिकरण आणि कोल्हापूर यांची आगेकूच

विमानतळ प्राधिकरण आणि कोल्हापूर यांच्या अनुक्रमे महिला आणि पुरुष संघांनीसुद्धा उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांच्या ‘ब’ गटात विमानतळ प्राधिकरणाने विदर्भाचा १२-६ असा एक डाव आणि ६ गुण राखून पराभव केला. प्रियंका भोपी, कविता घाणेकर, ऐश्वर्या सावंत यांनी विमानतळसाठी दमदार कामगिरी केली. विदर्भाकडून काजल राजूने कडवी झुंज दिली. पुरुषांच्या ‘ड’ गटात कोल्हापूरने झारखंडला २१-७ असा एक डाव आणि १४ गुणांनी नमवले. अभिजीत पाटील, नीलेश जाधव यांनी कोल्हापूरसाठी बहुमूल्य योगदान दिले.