पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले. खो-खो क्रीडा प्रकारात १७ वर्षांखालील मुले व मुली अशा दोन्ही गटांत महाराष्ट्राने विजेतेपद मिळवले. त्याशिवाय टेनिस, बॉक्सिंगमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.

खो-खो क्रीडा प्रकारात मक्तेदारी गाजवणाऱ्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे १७ वर्षांखालील (कुमार) मुले व मुली या दोन्ही विभागांत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने अलाहिदा डावानंतर दिल्लीचे आव्हान १९-१७ असे परतवले, तर मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर १९-८ असा एकतर्फी विजय नोंदवला.

मुलींच्या गटात महाराष्ट्राने पूर्वार्धात ७-५ अशी आघाडी घेतली होती, तर दिल्लीने पूर्ण वेळेत १२-१२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना अलाहिदा डावावर गेला. या डावात महाराष्ट्राच्या जान्हवी पेठेने शेवटची दोन मिनिटे नाबाद संरक्षण करत संघाला निसटता विजय मिळवून दिला. महाराष्ट्राकडून किरण शिंदे (३.२० मि.), अश्विनी मोरे (२ मि., २.५० मि.), जान्हवी पेठे (१.४० मि., अलाहिदा डावात नाबाद २ मि. व एक गडी) यांनी सुरेख खेळ केला.

मुलांच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशविरुद्ध १९-८ असे सहज हरवले. महाराष्ट्राकडून ऋषिकेश शिंदे (नाबाद २.४० मि., १.४० मि. व ४ गडी), रोहन कोरे (२.३० मि. व २ गडी), कर्णधार चंदू चावरे (२.१० मि. व ३ गडी) यांनी कौतुकास्पद खेळ केला.