|| ऋषिकेश बामणे

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तारखांमुळे भारतीय खो-खो महासंघाचा निर्णय

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेमुळे अल्टिमेट खो-खो लीगचा पहिला हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता खो-खो लीग वर्षांअखेरीस किंवा पुढील वर्षीच्या प्रारंभी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेला गेले दोन मुहूर्त मिळाले नव्हते; परंतु यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात या स्पर्धा होणार असून, त्यापुढील काही आठवडय़ांमध्ये काठमांडू (नेपाळ) येथे दक्षिण आशियाई स्पर्धा होणार आहेत. त्याशिवाय राज्य आणि जिल्हा पातळीवरील विविध स्पर्धासुद्धा यादरम्यानच्या काळात सुरू राहणार असल्यामुळे खेळाडूंवर अतिरिक्त ताण पडू नये, हेसुद्धा खो-खो लीग पुढे ढकलण्यामागे कारण आहे.

‘‘काही महिन्यांपूर्वी झालेल्या महासंघाच्या बैठकीनुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खो-खो लीग खेळवण्याचा विचार सुरू होता; परंतु आता व्यग्र कार्यक्रमामुळे त्याचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व दक्षिण आशियाई या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धा असल्यामुळे महासंघाने खो-खो लीगचे आयोजन त्यानंतर करण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धासुद्धा याच कालखंडात होणार असल्याने खेळाडूंनी स्वाभाविकपणे त्या स्पर्धाना प्राधान्य देणे आवश्यक आहे,’’ असे भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी सांगितले.

४० नामांकित खेळाडूंची चाचणी

मे महिन्याच्या अखेरीस नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियममध्ये भारतातील ४० नामांकित खेळाडूंना बोलावून त्यांची खो-खो लीगच्या संभाव्य नियमांनुसार चाचणी घेण्यात आली. त्याशिवाय कॅमेऱ्यांची दिशा, नियमांची पडताळणी तसेच स्पर्धा कोठे खेळवायची, याविषयी चर्चा करण्यात आली. परंतु त्यानंतर मात्र या लीगसंबंधी अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.

खेळाडूंची लिलावप्रक्रिया होणारच!

खो-खो लीगच्या लिलाव प्रक्रियेविषयी गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चाना उधाण आले होते. लिलाव प्रक्रिया रद्द करून दुसरी पद्धत वापरून खेळाडूंची निवड केली जाणार आहे, असे समजले होते. परंतु जाधव यांनी लिलाव प्रक्रियेविषयीच्या सर्व अफवांना धुडकावून लावले. ‘‘खो-खो लीगसाठी लिलाव प्रक्रियेद्वारेच खेळाडूंची निवड होणार आहे. त्याशिवाय लवकरच याविषयी अधिकृत स्वरूपही जाहीर करण्यात येईल,’’ असे जाधव म्हणाले.