आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाची कबुली; संजीता चानूकडून चौकशीची मागणी

वेटलिफ्टिंगपटू संजिता चानूच्या उत्तेजक चाचणी नमुन्याचा क्रमांक देताना चूक झाल्याची कबुली आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने दिली आहे. चुकीच्या नमुन्यामुळे ती चाचणीत दोषी आढळल्याचे जाहीर करण्यात आले होते, त्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या संजिताने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दोन विभिन्न मूत्रनमुने आंतरराष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीकडे सोपवण्यात आले होते. मात्र प्रशासकीय चुकीमुळे त्यात क्रमांकाचा काही बदल झाल्याने चुकीमुळे संजिताचा नमुना दोषी आढळल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कोण दोषी आहे की हेतुपुरस्सर कुणी खोडसाळपणा केला, याचा तपास करण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी संजिताने केली आहे. अशा प्रकारची गंभीर चूक होऊच कशी शकते, असा सवाल संजिताने केला आहे.

दोन विभिन्न क्रमांक

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने गतवर्षी १७ नोव्हेंबरला अमेरिकेतील नेवाडा येथे घेतलेल्या नमुन्याचा क्रमांक हा १५९९००० असल्याचे म्हटले होते. १५ मे रोजी संजिताला पाठवलेल्या सूचनेत तिच्या नमुन्याचा क्रमांक हा १५९९१७६ असल्याचे सांगून निकाल देण्यात आला. त्यात अमेरिकेच्या उत्तेजक प्रतिबंधक समितीने नमुना दोषी असल्याचा अहवाल देत त्याची प्रत संजिता, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघ आणि जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संघटनेकडे पाठवली होती. मात्र त्याबाबतचा अहवाल देताना क्रमांकाबाबत प्रशासकीय चूक झाल्याचे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेने कळवले आहे.

चौकशीची मागणी

इतक्या महत्त्वाच्या प्रकरणात अशा प्रकारची गंभीर चूक कशी केली जाऊ शकते, असा सवाल करत संजिताने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संजिताने यापूर्वीदेखील ती निर्दोष असल्याचा दावा केला असून तो नमुना तिचा आहे की दुसऱ्या कुणाचा त्याबाबत डीएनए चाचणी करण्याची मागणीदेखील केली आहे.