अ‍ॅथलेटिक्समध्ये चार भारतीय खेळाडूंनी चार विविध प्रकारांत मिळून एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. खुशबीर सिंगने चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकावर नाव कोरत ऐतिहासिक कामगिरी केली. राजीव अरोकिआ आणि एम.आर.पुवम्मा यांनी ४०० मी धावण्याच्या शर्यतीत, तर मंजू बालाने गोळाफेक प्रकारात कांस्यपदकावर कब्जा केला.
खुशबीर सिंगने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत चालण्याच्या शर्यतीत पदक पटकावण्याचा मान मिळवणारी खुशबीर सिंग पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली आहे. पंजाबच्या २१ वर्षीय खुशबीरने १ तास, ३३ मिनिटे आणि ७ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. चीनच्या ल्यु झिऊझीने सुवर्णपदक पटकावले. चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या खुशबीरने १८ किलोमीटपर्यंत सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर होती, मात्र यानंतर तिने आपला वेग वाढवला आणि दुसरे स्थान पटकावले. यावर्षी जपानमध्ये झालेल्या आशियाई चालण्याच्या अजिंक्यपद स्पर्धेत खुशबीरने कांस्यपदकाची कमाई केली होती. या स्पर्धेत पदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली होती. २०१२ मध्ये कोलंबो येथे झालेल्या आशियाई कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावत खुशबीरने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार सुरुवात केली होती.
राजीव अरोकिआने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले. राजीवने ४५.९२ सेकंदांत ही शर्यत पूर्ण करत स्वत:चाच राष्ट्रीय विक्रमात सुधारणा केली. अरोकिआची भारतीयांतर्फे झालेले हे सातवे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. याच प्रकारात महिलांमध्ये अनुभवी आर.एम.पुवम्माने कांस्यपदकाची कमाई केली. तिने ही शर्यत ५२.३६ सेकंदांत पूर्ण केली. मनदीप कौरला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या प्रकारातील अन्य भारतीय कुन्हू मुहम्मदला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, गोळाफेक प्रकारात मंजू बालाने कांस्यपदक पटकावले. तिने पहिल्या प्रयत्नात ६०.४७ मीटर अंतरावर गोळा फेकला. त्यानंतर तिचा प्रयत्न पंचांनी अवैध ठरवला. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात तिने ५७. ८० आणि ५७.१९ अंतरावर गोळा फेकल्याने तिला तिसरे स्थान मिळाले.