करोना विषाणूचा सामना करण्यासाठी मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. BCCI नेदेखील IPL 2020 ही स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केली आहे. मात्र क्रीडा स्पर्धा रद्द होत असल्यामुळे होणार आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी ICC ने विविध प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना आता हळूहळू यश येताना दिसत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं असून त्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी (आज) इंग्लंडमध्ये दाखल होणार असल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे.

वेस्ट इंडिजचा नियोजित इंग्लंड दौरा हा जून महिन्यात होता. पण करोनाच्या तडाख्यामुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार आता ८ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. ICC च्या नव्या नियमांचा अवलंब करण्याच्या दृष्टीने मालिका सुरू होण्याच्या महिनाभर आधीच वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व कसोटी सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संघ इंग्लंडसाठी प्रयाण करत असल्याचा एक छोटा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने या मालिकेसाठी आपला १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. वेस्ट इंडिज संघातील डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि किमो पॉल या ३ खेळाडूंनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे कारण देत इंग्लंड दोऱ्यावर जाण्यास नकार दिल्याचे वृत्त डेली मेलने दिले होते. त्यावर, सध्याच्या खडतर काळात मंडळ कोणत्याही खेळाडूवर दौऱ्यावर जाण्याची बळजबरी करणार नाही, असं विंडीज क्रिकेट मंडळाने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला.

वेस्ट इंडिजचा संघ – जेसन होल्डर, क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शेनॉन गॅब्रिअल

कसोटी मालिकेचं वेळापत्रक –

८ ते १२ जुलै – पहिली कसोटी (एजेस बाऊल)
१६ ते २० जुलै – दुसरी कसोटी (ओल्ड ट्रॅफर्ड)
२४ ते २८ जुलै – तिसरी कसोटी (ओल्ड ट्रॅफर्ड)