सर्वात आधी इंडोनेशियन ओपन आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्यानंतर श्रीकांतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत श्रीकांतने सर्वोत्तम ८ खेळाडूंच्या यादीत प्रवेश केलाय. नवीन क्रमवारीनूसार किदम्बी श्रीकांतला ८ व्या क्रमांकाचं स्थान मिळालं आहे.

२०१५ साली श्रीकांत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र त्यानंतर श्रीकांतचा फॉर्म हरवल्यामुळे त्याची घसरण झाली. मात्र लागोपाट २ स्पर्धांची विजेतेपद मिळवत श्रीकांतने सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत पुन्हा एकदा धमाकेदार पुनरागमन केलं आहे. आता आगामी काळात श्रीकांतला पहिल्या स्थानाचे वेध लागलेले आहेत.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिळवलेल्या विजयामुळे श्रीकांतच्या खात्यात ९२०० गुणांची वाढ झाली. श्रीकांतसोबत ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य पुर्व फेरीत धडक मारणारा साई प्रणीत १५ व्या तर अजय जयराम १६ व्या स्थानावर पोहचला आहे. मात्र एच.एस. प्रणॉयच्या आकडेवारीत घसरण झालेली आहे.
याव्यतिरीक्त सायना नेहवालही जागतिक क्रमवारीत एका स्थानाने पुढे जात १५ व्या स्थानावर विराजमान झाली आहे. दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर राहिलेल्या सायनाच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली होती. श्रीकांतच्या या कामगिरीबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ५० लाखांचं इनाम घोषीत त्याचा सत्कार केला आहे.

आंध्रप्रदेश सरकारने श्रीकांतच्या या कामगिरीवर खुश होऊन त्याला राज्य शासनाच्या सेवेत क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्याचं पद बहाल केलं आहे. याचसोबत श्रीकांतला प्रशिक्षण देणारे भारताचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचाही आंध्रप्रदेश सरकारने १५ लाख रुपयांचं पारितोषिक देऊन सत्कार केला आहे.