भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत यंदाच्या हंगामात चांगलाच फॉर्मात आहे. सध्या श्रीकांत फ्रेंच ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तयार होत आहे, उपांत्य फेरीत श्रीकांतला भारताच्याच एच. एस. प्रणॉयचा सामना करायचा आहे. मात्र या हंगामात श्रीकांतने चीनच्या लीन डॅन या खेळाडूला मागे टाकत एक विक्रम आपल्या नावे केला आहे. एक वर्षात ३५ सामने जिंकत श्रीकांतने डॅनचा ३४ सामने जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. आजच्या सामन्यात श्रीकांतने प्रणॉयचा पराभव केल्यास हा त्याचा ३६ वा विजय ठरेल.

श्रीकांतने फ्रेंच ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत शी युकीचा पराभव केला. पहिला सेट ८-२१ अशा फरकाने गमावल्यानंतर श्रीकांतने सामन्यात दमदार पुनरागमन करत २१-१९, २१-९ असे लागोपाठ सेट जिंकत सामन्यात बाजी मारली. याआधी श्रीकांतने इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क ओपन सुपरसिरीज स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. मात्र सिंगापूर ओपन स्पर्धेत त्याला बी. साई प्रणीतकडून पराभव स्वीकारावा लागला होता. प्रणॉयवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारल्यास एका वर्षात पाचव्या सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारा श्रीकांत हा एकमेव भारतीय खेळाडू ठरणार आहे.

अवश्य वाचा – फ्रेंच ओपन बॅडमिंटन – उपांत्य फेरीत श्रीकांत-प्रणॉय आमनेसामने, अंतिम फेरीची चुरस वाढली

फ्रेंच ओपन स्पर्धेत श्रीकांतला सलामीला फारसा प्रतिकार सहन करावा लागला नाही. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत श्रीकांतने पुढच्या फेरीसाठी आगेकूच केली. मात्र उपांत्यपुर्व फेरीत श्रीकांतला चांगलीच कडवी टक्कर मिळाली. मात्र पिछाडी भरुन काढत श्रीकांतने ८-२१, २१-१९, २१-९ असा रोमहर्षक विजय मिळवला. दुसरीकडे प्रणॉयनेही या स्पर्धेत ली ह्यून, ख्रिस्टन विटींगुश, जीओन ह्योंक जीन यासारख्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत जो खेळाडू सामना जिंकेल तो या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी फेव्हिरीट मानला जातोय. जपानच्या केंटा निशीमोटो आणि डेन्मार्कच्या अँडर्स अँटोसेन यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.