क्वालालम्पूर : मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी खालावली असतानाच, किदम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँगला विजयासाठी चांगलेच झुंजवले. मात्र श्रीकांतचे आव्हान चेन लाँगने दोन गेममध्ये संपुष्टात आणले.

आठव्या मानांकित श्रीकांतने गेल्या आठवडय़ात इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व सामन्यात दमदार खेळ करत श्रीकांतने पहिल्या गेममध्ये आघाडी मिळवली होती, मात्र या आघाडीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरल्याने श्रीकांतला १८-२१, १९-२१ असा पराभव सहन करावा लागला. श्रीकांतचा हा या मोसमातील उपांत्यपूर्व फेरीतील चौथा पराभव ठरला आहे.

गेल्या सहा सामन्यांत चेन लाँगला फक्त एकदाच पराभूत करणाऱ्या श्रीकांतने पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासूनच चांगला खेळ करत ११-७ अशी आघाडी घेतली. त्यानंतरही श्रीकांतने चेन लाँगला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. श्रीकांत १६-११ अशा आघाडीवर असताना चेन लाँगने आपल्या अनुभवाचा फायदा उठवत हळूहळू सामन्यात पुनरागमन केले. चेन लाँगने १७-१७ अशी बरोबरी साधत श्रीकांतला गुण मिळवण्यासाठी झुंजवले. अखेर श्रीकांतला पहिल्या गेमवर पाणी सोडावे लागले.

दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतला खेळात सातत्य राखता आले नाही. चेन लाँगच्या फटक्यांवर श्रीकांतचे अनेकदा निर्णय चुकत होते. त्यामुळेच तो ७-११ अशा पिछाडीवर पडला होता. चेन लाँगने १६-८ अशी भक्कम आघाडी घेतली असताना श्रीकांतने जोमाने पुनरागमन करत १९-१९ अशी बरोबरी साधली. मात्र चेन लाँगने बचावात्मक खेळाचे अप्रतिम प्रदर्शन करत बाजी मारली.