एकेरीत प्रणॉयची आगेकूच; दुहेरीत सात्त्विक-चिराग जोडी पराभूत

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

विजेतेपदाची अपेक्षा असलेल्या किदम्बी श्रीकांतला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र त्याचा सहकारी एच.एस.प्रणॉयने आव्हान टिकवले आहे.

बॅडमिंटनसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चीनच्या हुआंग युक्सियांगने श्रीकांतला २१-११, १५-२१, २२-२० असे संघर्षपूर्ण लढतीत हरवले. प्रणॉयने जागतिक क्रमवारीतील माजी तृतीय मानांकित खेळाडू टॉमी सुगियातरेवर (इंडोनेशिया) २१-१०, २१-१९ असा सनसनाटी विजय मिळवला. मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव जेरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांना चीनच्या वांग यिलुयू व हुआंग दोंगपिंग यांनी २१-६, २१-१० असे निष्प्रभ केले. पुरुषांच्या दुहेरीत सात्त्विक साईराज रान्किरेड्डी व चिराग शेट्टी यांचेही आव्हान संपुष्टात आले. त्यांना द्वितीय मानांकित मथायस बोई व कस्र्टन मोगेन्सन यांनी २१-१६, १६-२१, २३-२१ असे पराभूत केले.

सदोष पंचगिरीमुळेच पराभव

श्रीकांतने आपल्या पराभवाला सामन्यातील सदोष पंचगिरीला जबाबदार धरले आहे. सव्‍‌र्हिसबाबत पंचांनी दिलेले निर्णय अत्यंत चुकीचे होते. सव्‍‌र्हिसबाबत जो नवीन नियम अमलात आणला गेला आहे. त्याबाबत विविध पंचांच्या कामगिरीत खूपच विरोधाभास दिसून आला, अशी टीका श्रीकांतने केली.

‘‘सव्‍‌र्हिस बरोबर असूनही माझ्या सव्‍‌र्हिस अयोग्य ठरवण्यात आल्या. एवढय़ा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पंचांकडून अशा चुका अपेक्षित नाहीत. त्यांच्या चुकांमुळे माझ्या खेळावर विपरीत परिणाम झाला. विशेषत: शेवटच्या गेममध्ये महत्त्वाच्या क्षणी माझ्या विरोधात निर्णय गेला, त्यामुळे माझे चित्त विचलित झाले,’’ असे श्रीकांतने सांगितले.

‘‘पहिल्या गेममध्ये माझी सुरुवात चांगली झाली नाही. खरे तर या गेममध्ये मी केलेल्या चुकांचा चीनच्या खेळाडूला फायदा झाला. दुसऱ्या गेममध्ये मी चुकांवर नियंत्रण ठेवले. ही गेम घेतल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी मी अक्षम्य चुका केल्या. या चुका टाळता आल्या असत्या,’’ असेही श्रीकांतने सांगितले.

सात्त्विक म्हणाला, ‘‘आम्ही खूप चांगला खेळ केला. खरं तर हा सामना आम्ही जिंकू शकलो असतो. महत्त्वाच्या क्षणी आमच्याकडून सव्‍‌र्हिसच्या चुका झाल्या. अशा चुका टाळता आल्या असत्या. अर्थात आमच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या तुलनेत आम्ही अनुभवात कमी पडलो. आम्ही यापूर्वी तीन वेळा मथायस व कर्स्टन यांच्याकडून पराभव स्वीकारला आहे. आमची ही पहिलीच ऑल इंग्लंड स्पर्धा होती.’’