कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी केवळ यश, विजय, जेतेपद अनिवार्य असते या समीकरणाला युवा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने छेद दिला. सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीकांतसमोर बलाढय़ ली चोंग वेईचे आव्हान होते, मात्र त्याच्या करिश्म्याचे दडपण न घेता श्रीकांतने प्रत्येक गुणासाठी ली याला टक्कर दिली. ली याने हा सामना २१-१९, २१-१८ असा जिंकला तरी श्रीकांतने दर्दी बॅडमिंटनप्रेमींची मने जिंकून घेतली.
मजल दरमजल करत आगेकूच केल्यानंतर उपांत्य फेरीत श्रीकांतसमोर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अव्वल मानांकित ली चोंग वेईचे आव्हान उभे ठाकले. ली चोंग वेईचा दबदबा पाहता श्रीकांतला विजय मिळवणे अशक्य नसले तरी अवघड नक्कीच होते. ली चोंग वेईने श्रीकांतला नमवत अंतिम फेरीत धडक मारली, मात्र श्रीकांतने त्याला दिलेली टक्कर अविस्मरणीय ठरली. लीसारख्या दिग्गज खेळाडूसमोर खेळतानाही कोणतेही दडपण न घेता श्रीकांतने खेळ केला आणि म्हणूनच प्रत्येक गुणासाठी त्याने लीची परीक्षा पाहिली. पराभव झाला असला तरी मातब्बर खेळाडूंविरुद्धची श्रीकांतची कामगिरी पाहता भारतीय बॅडमिंटनचे भविष्य सायना-सिंधूपुरते मर्यादित नाही, याची स्पष्ट जाणीव झाली. श्रीकांतला पराभवाला सामोरे जावे लागल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
पहिल्या गेममध्ये लीचे दमदार आणि भेदक स्मॅशेस, नेटजवळच्या कौशल्यपूर्ण खेळाला प्रत्युत्तर देत श्रीकांतने आपली कर्तबगारी सिद्ध केली. १५-१६ या गुणस्थितीतून त्याने १९-१६ अशी आगेकूच केली. श्रीकांत गेम जिंकत अद्भुत किमया साकारणार असे वाटत असतानाच लीने आपला अनुभव पणाला लावत बाजी मारली.
पहिला गेममध्ये थरारक विजयासह आत्मविश्वास उंचावलेल्या ली याने दुसऱ्या गेममध्ये लौकिकाला साजेसा खेळ करत १५-८ अशी दमदार आघाडी घेतली. ही आघाडी त्याने १९-१२ अशी वाढवली.
पराभव अटळ असताना श्रीकांतने सलग सहा गुणांची कमाई करत ली याला अडचणीत टाकले. मात्र मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत लीने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.