भारताचा युवा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने स्विस खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद पटकावले. त्याने डेन्मार्कच्या व्हिक्टर अक्सलेनचे कडवे आव्हान परतवून ही ऐतिहासिक कामगिरी केली़  चौथ्या मानांकित श्रीकांतने ४७ मिनिट चाललेल्या अटीतटीच्या या लढतीत अक्सलेनवर २१-१५, १२-२१, २१-१४ असा दमदार विजय मिळवला़
पहिल्या गेमपासून त्याने सकारात्मक खेळ केला, परंतु अक्सलेन यानेही उत्कृष्ट पलटवार करून गेम ८-८ असा बरोबरीत आणला़  अखेर श्रीकांतने आक्रमक पवित्रा घेत हा गेम २१-१५ असा सहज  नावावर केला़  दुसऱ्या गेममध्ये  अक्सलेनने बाजी मारून सामन्यातील चुरस आणखी वाढवली़  २-२ अशा बरोबरीत चाललेल्या या गेममध्ये अक्सलेनने ७-२ अशी आघाडी घेतली़  ही आघाडी हळूहळू वाढवत अक्सलेने हा गेम २१-१२ असा जिंकला़  तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये ३-० अशा आघाडीवर असलेल्या श्रीकांतला अक्सलेनने जबरदस्त टक्कर देत ४-४ अशी बरोबरी साधली़  नंतर हा गेम ९-९ आणि १३-१३ असा बरोबरीत आला़  मात्र,  श्रीकांतने पुढील पाच गुणांची कमाई करत हा गेम २१-१४ असा जिंकून सामना नावावर केला़

२०१४मध्ये चायना खुल्या सुपर सीरिज स्पध्रेच्या अंतिम फेरीत श्रीकांतने पाच वेळा विश्वविजेता आणि दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणाऱ्या लिन डॅनला नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली होती. श्रीकांतने २०१३ मध्ये थायलंड खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावले होत़े  इंडियन खुल्या ग्रां़ प्रि़ स्पध्रेत उपविजेतेपदावर त्याला समाधान मानावे लागले होत़े