थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा

भारताचा आघाडीचा बॅडिमटनपटू किदम्बी श्रीकांत याने चीन खुल्या जागतिक टूर सुपर ७५० स्पर्धेमध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. श्रीकांतने सहज विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली असली तरी एच. एस. प्रणॉयला मात्र गाशा गुंडाळावा लागला आहे.

पाचव्या मानांकित श्रीकांतने फ्रान्सच्या लुकास कोर्वी याचा २१-१२, २१-१६ असा अवघ्या ३५ मिनिटांत धुव्वा उडवला. त्याला आता पुढील फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तो याच्याशी झुंज द्यावी लागेल. पुरुष एकेरीच्या सलामीच्या सामन्यात प्रणॉयला इंडोनेशियाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जोनाथन ख्रिस्ती याच्याकडून ११-२१, १४-२१ असे पराभूत व्हावे लागले.

भारताची युवा खेळाडू वैष्णवी रेड्डी जाक्का हिलाही पराभवाचा सामना करावा लागला. थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँग हिने वैष्णवीला २१-१२, २१-१६ असे सहज हरवले. मिश्र दुहेरीत, भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी कडवी झुंज दिली. तरीही त्यांना मलेशियाच्या सातव्या मानांकित चॅन पेंग सून आणि गोह लिऊ यिंग यांच्याकडून १९-२१, १७-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला.

श्रीकांतने सुरुवातीच्या १-४ अशा पिछाडीनंतर स्वत:ला सावरत शानदार खेळाचे प्रदर्शन केले. त्यानंतर ११-७ अशी आघाडी घेत ती पुढे वाढवत नेली. जागतिक क्रमवारीतील ४२व्या क्रमांकावर असलेल्या कोर्वीला श्रीकांतच्या वेगवान खेळाचा सामना करताना अडचणी येत होत्या. पहिला गेम सहजजिंकल्यानंतर श्रीकांतला दुसऱ्या गेममध्ये कोर्वीने कडवी लढत दिली. सुरुवातीच्या ७-७ अशा बरोबरीनंतर श्रीकांतने ११-९ अशी निसटती आघाडी घेतली. अखेर २१-१६ अशा फरकासह श्रीकांतने कोर्वीवर तिसऱ्या विजयाची नोंद केली.