किदम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांनी जर्मन ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या श्रीकांतने नेदरलँड्सच्या इरिक मेजिसवर १५-२१, २१-६, २१-१६ असा विजय मिळवला. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपने आर्यलडच्या जोशुआ मागीवर २१-१२, २१-११ अशी मात केली. ११व्या मानांकित कश्यप दुखापतीतून सावरत पुनरागमन करत असून, पुढच्या लढतीत त्याच्यासमोर कोरियाच्या सन वान हो याचे आव्हान असणार आहे.
कोरियाच्या ली डोंग केयुनने समीर वर्माला २१-८, १९-२१, २१-१९ असे नमवले. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीने मार्कुस एलिस आणि ख्रिस लँग्रिज जोडीचा २१-१६, १९-२१, २१-१७ असा पराभव केला. सायनाच्या अनुपस्थितीत महिला एकेरीत सिंधूवर मदार आहे.

 

‘वलयांकित जीवनशैलीची सवय नाही’
नवी दिल्ली : कबड्डी खेळाने आम्हाला पैसा व प्रसिद्धी अमाप दिली आहे. मात्र काही वेळा वलयांकित जीवनशैलीचा उबग येतो, असे प्रो कबड्डी लीगमध्ये भरपूर प्रसिद्धी मिळालेल्या अनुप कुमार, राहुल चौधरी, नीलेश शिंदे यांनी सांगितले. ‘‘मातीवरील कबड्डीपेक्षा मॅटवरील प्रो कबड्डी लीगमुळे हा खेळ घराघरात पोहोचला आहे. आम्हाला एखाद्या सिनेकलाकाराप्रमाणे प्रसिद्धी मिळू लागली आहे. मात्र काही वेळा त्याचाही त्रास होतो. विशेषत: लीगच्या निमित्ताने जाहिराती करण्यासाठी खूप वेळ जातो. सतत सुटाबुटात राहावे लागते. व्हॅनिटी व्हॅनमध्ये खूप वेळ बसण्याची सवय नाही. त्यामुळे कंटाळा येतो. त्यापेक्षा मैदानावर जाऊन सराव करण्यास मी प्राधान्य देईन. ‘प्रो कबड्डीने खेळाला खूप मोठे केले आहे. आता त्याची लोकप्रियता टिकवून ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे,’’ असे अनुप कुमारने सांगितले. ‘‘प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा ही आम्हा कबड्डीपटूंसाठी लाभलेली नवी देणगी आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच आम्हाला हे वलय व पैसा मिळाला आहे. या खेळाची लोकप्रियता साऱ्या जगात नेण्याची व या खेळाला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा मिळवून देण्याची आम्हावर जबाबदारी आहे,’’ असे नीलेश शिंदेने सांगितले.
‘‘प्रो कबड्डी लीगमधील सहभागामुळे इराण व कोरियाच्या खेळाडूंना भरपूर सरावाचा अनुभव मिळू लागला आहे. त्यांच्या खेळात सुधारणा झाली आहे. असे असले तरी इराण व कोरियाचे खेळाडू जागतिक किंवा आशियाई स्तरावर आम्हाला पराभूत करू शकणार नाही,’’ असे राहुल चौधरीने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘सामन्यांपेक्षाही या लीगसाठी प्रोमो करण्याचेच आमच्यासाठी आव्हान असते. दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार वावरणे काही वेळा कठीण असते. अर्थात हळूहळू त्याची सवय झाली आहे.’’

 

धवल, उथप्पा लग्नाच्या बेडीत
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई<br />भारताचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि फलंदाज रॉबिन उथप्पा हे दोघेही गुरुवारी लग्नाच्या बेडीत अडकले. धवलचा विवाह खाजगी कंपनीमध्ये फॅशन समन्वयक श्रद्धा खरपुडेशी झाला, तर रॉबिन महिला टेनिसपटू शीतल गौतमशी विवाहबद्ध झाला.
धवलचा विवाह मराठमोळ्या पद्धतीने झाला. या छोटेखानी विवाह सोहळ्यात फक्त धवलचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. धवलचा मुंबईच्या संघातील सहकारी रोहित शर्मा बांगलादेशमध्ये आशिया चषक स्पर्धेत खेळत असला तरी त्याने आपल्या मित्राला ‘ट्विटर’च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. उथप्पाच्या लग्नाला यावेळी भारताचा अष्टपैलू इरफान पठाण आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाची सहमालकीण जुही चावला उपस्थित होती.