जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर विराजमान असलेल्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने स्वप्नवत हंगामातील विजयी घौडदौड कायम राखत चौथ्या सुपर सीरिज विजेतेपदावर नाव कोरले. फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत श्रीकांतने १० व्या मानांकित जपानच्या केंटा निशीमोटोचा २१-१४, २१-१३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. यंदाच्या हंगामात पाचव्यांदा सुपर सीरिज स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या श्रीकांतने उपांत्य फेरीत भारताच्याच एच. एस. प्रणॉयला पराभूत केले होते.

या विजयासह  एका वर्षात चार सुपर सीरिज जिंकण्याचा पराक्रम करणारा श्रीकांत पहिला भारतीय  बॅडमिंटनपटू ठरला आहे. तर  स्तरावर अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू आहे. यापूर्वी चीनच्या लीन डान आणि चेन लॉग यांच्यासह मेलिशियाच्या ली चॉग वीने चारवेळा सुपर सीरिज जिंकली आहे. श्रीकांतने अवघ्या ३४ मिनिटांच्या खेळात जापानच्या केंटा निशीमोटोचा पराभव केला. खेळाच्या सुरुवातीला जपानच्या खेळाडूने ९-५ अशी आघाडी घेतली होती. मात्र श्रीकांतने ही आघाडी मोडीत काढत खेळाचे पारडे आपल्या बाजून झुकवले. सामन्यात ९-९ अशी बरोबरी साधल्यानंतर प्रतिस्पर्ध्याला अधिक संधी न देता श्रीकांतने पहिला सेट २१-१४ असा जिंकला. त्यानंतरच्या दुसऱ्या सेटमध्येही दमदार खेळ करत श्रीकांतने २१-१३ गुणांसह सामन्यासह विजेतेपदावर आपले नाव कोरले.