News Flash

किदम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणाऱ्या श्रीकांतने दुसऱ्या गेममध्ये सहा गेमपॉइंट वाया घालवले.

(संग्रहित छायाचित्र)

हाँगकाँग खुली बॅडमिंटन स्पर्धा

बिगरमानांकित किदम्बी श्रीकांतने कडवी झुंज देत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात त्याला शनिवारी अपयश आले. श्रीकांतला हाँगकाँगच्या ली चेऊक यिऊ याच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत व्हावे लागले.

गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणाऱ्या श्रीकांतने दुसऱ्या गेममध्ये सहा गेमपॉइंट वाया घालवले. त्यामुळे ४२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात श्रीकांतला ९-२१, २३-२५ अशी हार पत्करावी लागली. इंडिया खुल्या ‘सुपर ५००’ स्पर्धेत अव्वल चार जणांमध्ये स्थान मिळवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीकांतने उपांत्य फेरी गाठण्याची करामत केली.

संपूर्ण स्पर्धेत सरस खेळ करणाऱ्या श्रीकांतला मात्र उपांत्य फेरीत आपला खेळ उंचावता आला नाही. घरच्या चाहत्यांचा पाठिंबा मिळत असल्यामुळे ली चेऊक यानेही दमदार स्मॅशेसची सरबत्ती केली.

ली चेऊकचे फटके परतवण्यात श्रीकांत अपयशी ठरल्यामुळे पहिल्या गेमच्या सुरुवातीलाच तो १-६ असा पिछाडीवर पडला. त्यानंतर श्रीकांतला गेममध्ये पुनरागमन करणे जमलेच नाही. ली चेऊकचे फटके नेटवर किंवा कोर्टबाहेर जात असल्यामुळे श्रीकांतला गुण मिळत होते. त्यातून सावरत ली चेऊकने अप्रतिम स्मॅशेस लगावत पहिल्या गेममध्ये मोठी आघाडी घेतली आणि हा गेम आपल्या नावावर केला.

दुसऱ्या गेममध्ये मात्र श्रीकांतने जोमाने पुनरागमन केले. पूर्वीच्या लयीत खेळ करू लागल्यामुळे श्रीकांतकडून चाहत्यांच्या अपेक्षाही उंचावल्या. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत दोघांनीही तोडीस तोड खेळ केला तरी श्रीकांतने काही गुणांच्या फरकाने आघाडी कायम टिकवली होती. २०-१७ अशा स्थितीत असताना श्रीकांतला सामन्यात बरोबरी साधण्याची संधी होती. पण श्रीकांतच्या धसमुसळ्या खेळामुळे ली चेऊकने २०-२० अशी बरोबरी साधली. त्यानंतर श्रीकांतला दोन वेळा गेमपॉइंट मिळाले. अखेर बहरात असलेल्या ली चेऊकने २५-२३ अशा फरकाने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला.

श्रीकांतच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. गेल्या वर्षी इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतने ली चेऊकला सरळ गेममध्ये पराभूत केले होते. त्या पराभवाचा वचपा ली चेऊकने या सामन्यात काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 2:03 am

Web Title: kidambi srikants challenge ends abn 97
Next Stories
1 झ्वेरेव्हकडून नदाल पराभूत
2 युरो चषक पात्रता फुटबॉल स्पर्धा : फिनलँड प्रथमच पात्र
3 IND vs BAN : सुरक्षाव्यवस्था भेदून विराटची भेट घेण्यासाठी चाहता थेट मैदानात
Just Now!
X