कॅरेबियन बेटांवर सुरू असलेल्या CPL टी२० स्पर्धेच्या १७व्या सामन्यात कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने धडाकेबाज विजय मिळवला. २८ चेंडूत दमदार ७२ धावांची खेळी करत पोलार्डने संघाला एकहाती सामना जिंकवून दिला. IPLच्या तोंडावर पोलार्डचा मैदानावरील हा अवतार चाहत्यांना नक्कीच खुश करणारा होता. या विजयासोबत पोलार्डचा संघ स्पर्धेत अद्याप अजिंक्य आहे.

मुंबई इंडियन्सने केलं कौतुक-

बार्बाडॉस त्रायडंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १४८ धावा केल्या. सलामीवीर शाय होप ४ धावांत बाद झाल्यावर जॉन्सन चार्ल्स आणि कायल मेयर्स यांनी डाव सांभाळला. अर्धशतकी भागीदारी केल्यावर चार्ल्स ४७ धावांवर बाद झाला. मेयर्सलाही अर्धशतकाने हुलकावणी दिली. तो ४२ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे २० षटकात त्यांनी दीडशतकही गाठता आले नाही.

VIDEO: पोलार्डचा गोलंदाजांना चोप-

१४९ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना नाईट रायडर्स संघाची अवस्था अतिशय बिकट झाली होती. लेंडल सिमन्सच्या ३२ धावा वगळता पहिले सहा फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. पण पोलार्डने गोलंदाजाना चोप दिला. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आपला इरादा पक्का असल्याचं दाखवून दिलं होतं. पोलार्डने अवघ्या २८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ७२ धावा कुटल्या. विजयासाठी आठ धावांची गरज असताना पोलार्ड बाद झाला पण तळाच्या फलंदाजांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.