अमेरिकन  फॉम्र्युला-वन * किमी रायकोनेनला अमेरिकन शर्यतीचे विजेतेपद

ऑस्टिन : लुईस हॅमिल्टनला फॉम्र्युला वनमधील जगज्जेतेपदासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. रविवारी रंगलेल्या अमेरिकन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत फेरारीच्या किमी रायकोनेन याने विजेतेपद पटकावले. जवळपास ११३ शर्यती आणि पाच वर्षांनंतर रायकोनेनचे हे पहिले विजेतेपद ठरले. याआधी रायकोनेन याने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियन शर्यतीचे जेतेपद पटकावले होते.

जगज्जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या फेरारीच्या सेबॅस्टियन वेट्टेलने अमेरिकन शर्यतीत चौथ्या क्रमांकावर मजल मारली. त्यामुळेच जगज्जेतेपदाचा फैसला आता पुढील आठवडय़ात रंगणाऱ्या मेक्सिकन शर्यतीत लागण्याची दाट शक्यता आला. हॅमिल्टनने ३४६ गुणांसह वेट्टेलला ७० गुणांनी पिछाडीवर टाकून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. आता या मोसमातील तीन शर्यती शिल्लक असून हॅमिल्टनला पाचव्यांदा जगज्जेतेपदावर नाव कोरण्यासाठी मेक्सिको शर्यतीत किमान सातव्या स्थानी (वेट्टेलजिंकला तरीही) मजल मारावी लागेल. जर या शर्यतीत विजेतेपद पटकावण्यात वेट्टेलला अपयश आले तर हॅमिल्टनचे जगज्जेतेपद निश्चित होईल.

अमेरिकन शर्यतीत रेड बुलच्या मार्क वेस्र्टापेन याने १८व्या क्रमांकावरून सुरुवात करीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. या दोघांचेही हॅमिल्टनने स्तुती केली. तो म्हणाला, ‘‘किमीचे अभिनंदन आणि मॅक्सने सुरेख कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली. शर्यतीत चांगली चुरस पाहायला मिळाली.’’ पोल पोझिशनपासून सुरुवात करूनही मर्सिडिझच्या हॅमिल्टनला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पहिल्याच लॅपमध्ये चूक केल्याचा फटका वेट्टेलला बसला.