स्टोनिअसचा प्रभावी मारा, विजय, साहा यांची अर्धशतके
गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या आणि बाद फेरीत प्रवेशाची शक्यता जवळपास मावळलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला. मार्कस स्टोनिअसच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पंजाबने मुंबईला १२४ धावांतच रोखले. मुरली विजय आणि वृद्धिमान साहाच्या संयमी खेळींच्या जोरावर पंजाबने आठ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पेलले.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने पहिल्याच षटकात हशिम अमलाला गमावले. टीम साऊदीने अमलाला भोपळाही फोडू दिला नाही. फलंदाजांसाठी आव्हानात्मक खेळपट्टीवर पंजाबचीही घसरगुंडी उडणार असे चित्र होते. मात्र मुरली विजय आणि बढती मिळालेला वृद्धिमान साहा यांनी सुरुवातीला एकेरी, दुहेरी धावांवर भर दिला. स्थिरावल्यानंतर या दोघांनी फटक्यांची पोतडी उघडली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. वृद्धिमान साहा ४० चेंडूत ५६ धावा करुन बाद झाला. मुरली विजयने ५२ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५४ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी मार्कस स्टोनिअसच्या भेदक माऱ्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने मुंबई इंडियन्सला अवघ्या १२४ धावांतच रोखले. उन्मुक्त चंद आणि अंबाती रायुडूला भोपळाही फोडता आला नाही. कीरेन पोलार्डने २७ तर नितीश राणाने २५ धावांची खेळी केली. स्टोनिअसने ४ षटकांत १५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ९ बाद १२४ (कीरेन पोलार्ड २७, नितीश राणा २५; मार्कस स्टोनिअस ४/१५) पराभूत विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब : १७ षटकांत ३ बाद १२७ (मुरली विजय ५४, वृद्धिमान साहा ५६; मिचेल मॅक्लेघान २/२४)
सामनावीर : मार्कस स्टोनिअस