सातत्याने असातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला बाद फेरीसाठी आता ‘करो या मरो’ असे समीकरण आहे. बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित दोन लढतींत विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांनी उर्वरित लढती गमावल्यास पंजाबचा बाद फेरीचा मार्ग सुकर होऊ शकतो. गुणतालिकेत तळाशी रेंगाळणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सशी पंजाबचा मुकाबला आहे. संघात एकापेक्षा एक खेळाडू असूनही सुमार कामगिरी करणाऱ्या दिल्लीचे आव्हान पंजाबसाठी सोपे ठरू शकते. कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टला बंगळुरुविरुद्ध सूर गवसल्याने पंजाबची फलंदाजीची च्िंाता मिटली आहे. डेव्हिड मिलर, शॉन मार्श, अझर मेहमूद तसेच मनदीप सिंग यांनी गिलख्रिस्टला साथ देणे आवश्यक आहे. गोलंदाजीत पंजाबला मेहनत करावी लागणार आहे. प्रवीण कुमार, परविंदर अवाना, हरमीत सिंग, पीयूष चावला, संदीप शर्मा यांना विकेट्स मिळवण्यासह धावा रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अष्टपैलू अझर मेहमूद पंजाबसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दुसरीकडे पराभवाची मोठी मालिका थांबवण्याचे आव्हान दिल्लीसमोर आहे. वीरेंद्र सेहवाग आणि महेला जयवर्धने यांनी आता तरी लौकिकानुसार खेळ करावा, अशी डेअरडेव्हिल्सच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. डेव्हिड वॉर्नर सातत्यपूर्ण खेळ करत आहे मात्र त्याला साथ मिळणे आवश्यक आहे.
वेळ : रात्री ८ पासून