किंग्ज इलेव्हन पंजाबचे आज आव्हान; सातत्य राखण्यासाठी यजमान उत्सुक
कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये दोन सामने जिंकले असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. पण त्यांनी मंगळवारच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभूत केल्यास त्यांना अव्वल स्थानावर पोहोचण्याची संधी असेल. त्यामुळे पंजाबविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताना अव्वल स्थान पटकावण्याचेच कोलकात्याचे लक्ष्य असेल. दुसरीकडे रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर पहिला विजय मिळवलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून चौथ्या स्थानावर जाण्याची नामी संधी चालून आली आहे. पण यासाठी त्यांना फॉर्मात असलेल्या कोलकातावर विजय मिळवावा लागेल.
कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर हा चांगल्या फॉर्मात आहे. दमदार फलंदाजी करत त्याने संघापुढे आदर्श निर्माण केला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात गंभीर मोहित शर्मा आणि संदीप सिंग यांचा सामना कसा करतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. गंभीरचा सहकारी सलामीवीर रॉबिन उथप्पाला मात्र कामगिरीत सातत्य राखावे लागेल. गंभीरबरोबर सुनील नरिन, आंद्रे रसेल, मनीष पांडे आणि सूर्य कुमार यादव चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. कोलकाताच्या विजयात फिरकीपटूंचाही महत्त्वाचा वाटा असतो, त्यामुळे त्यांच्या संघातील फिरकीपटूंच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा असतील.
महेंद्रसिंग धोनीसारख्या चाणाक्ष कर्णधाराच्या संघाला नमवण्याचे काम पंजाबने करून दाखवले आहे. मनन व्होराची पुण्याच्या संघाविरुद्धची कामगिरी ही लक्षवेधी ठरली. सलामीवीर मुरली विजयही सातत्याने चांगल्या धावा करत आहे. पण पंजाबच्या मधल्या फळीला मात्र अजूनही हवा तसा सूर गवसलेला नाही. गेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने धडाकेबाज फलंदाजी केली असली तरी त्याच्याकडून कामगिरीमध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही. पंजाबचे मध्यमगती गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, खासकरून संदीपची कामगिरी उजवी ठरत आहे. पण फिरकीपटू अक्षर पटेलला आपली छाप पाडता आलेली नाही. लेग स्पिनर प्रदीप साहूकडे चांगली गुणवत्ता आहे, पण त्याचा उपयोग संघाने योग्य पद्धतीने केल्यास तो त्यांच्यासाठी अव्वल गोलंदाज ठरू शकतो. दोन्ही संघांचा विचार केल्यास पंजाबपेक्षा कोलकात्याचे पारडे नक्कीच जड आहे. कोलकाता संघ हा परिपूर्ण वाटत असून त्यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. दुसरीकडे पंजाबच्या संघातील काही ठरावीक खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. पण पुण्याला पराभूत केल्यानंतर ते कोलकात्यालाही धक्का देतात का, याची उत्सुकता असेल.

संघ
किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), कायले अ‍ॅबॉट, मुरली विजय, मनन व्होरा, मिचेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरीत सिंग, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्क्स स्टॉयनिस, स्वप्निल सिंग, अरमान जाफर, फरहान बेहरादिन, के. सी. करिअप्पा, रिशी धवन, गुरकिराट सिंग मान, निखिल नाईक, शार्दूल ठाकूर.
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, युसूफ पठाण, पीयूष चावला, कुलदीप यादव, मनन शर्मा, अंकित राजपूत, राजगोपाल सतीश, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जॉन हॅस्टिंग, ब्रॅड हॉग, जेसन होल्डर, शेल्डन जॅक्सन, ख्रिस लिन, मॉर्ने मॉर्केल, सुनील नरीन, कॉलिन मुर्नो, आंद्रे रसेल आणि शकिब अल हसन.
वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून. प्रक्षेपण : सोनी सिक्स, सेट मॅक्स.