पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन त्यांच्याशी हुज्जत घालणे किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज संदीप शर्मा याला महागात पडले आहे. शर्माच्या सामन्याच्या मानधनातून ५० टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे. मोहालीत रविवरी गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यात हा प्रकार घडला.

पंचांशी हुज्जत घालण्याच्या आयपीएलच्या आचार संहितेच्या २.१.५ नियमाअंतर्गत संदीप शर्मा याला दोषी ठरविण्यात आले. सामन्याच्या पाचव्या षटकात संदीप शर्माने काही चेंडू टाकून झाल्यानंतर पंचांना कोणतीही पूर्वकल्पना न देता गोलंदाजीची बाजू बदलली. पंच ए. नंद किशोर यांनी त्वरित दखल घेऊन संदीप शर्माने टाकलेला चेंडू नो बॉल म्हणून घोषित केला. त्यावर संदीप शर्माने पंचांशी हुज्जत घातली. नंद किशोर यांनी संदीप शर्माची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण संदीपही आपल्या मुद्द्यावर ठाम होता. अखेर संघाचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याला मध्यस्थी करावी लागली. पंचांनी मॅक्सवेलला घडलेला प्रकार लक्षात आणून दिला आणि नियमांनुसार गोलंदाजाने पंचांना पूर्वकल्पना देणे आवश्यक असल्याचे सांगितले. सामना संपल्यानंतर आयपीएलच्या संकेतस्थळावर नियमांचा भंग केल्याप्रकरणी संदीप शर्मावर कारवाई करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले.

संदीप शर्मा हा किंग्ज इलेव्हनच्या गोलंदाजाचा प्रमुख दुवा आहे. संघासाठी यंदाच्या आयपीएलमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. संदीपने १० सामन्यांमध्ये १६ विकेट घेतल्या आहेत.