आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व संघ आता सज्ज झाले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आगामी हंगामात, मुख्य प्रशिक्षकपदावर मायकल हसीला नियुक्त करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. मायकल हसीसोबत अँडी फ्लॉवर, डॅरेन लेहमन आणि जॉर्ज बेली हे माजी खेळाडूदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

पंजाबच्या संघाला आतापर्यंत आयपीएलचं एकही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच पंजाबने रविचंद्रन आश्विनला कर्णधारपदावरुन काढलं. नवीन हंगामात आश्विन दिल्लीकडून खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी हंगामात संघाची नव्याने बांधणी करण्यासाठी पंजाब मायकल हसीला प्रशिक्षकपदावर नेमण्यात उत्सुक असल्याचं कळतंय. हसी सध्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मायकल हसीसोबत जॉर्ज बेली या माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचं नावही चर्चेत आहे. जॉर्ज बेलीने याआधी पंजाबच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. याआधी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन हे पंजाबच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा देत, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं संचालकपद स्विकारलं आहे.