आयपीएलच्या शेवटच्या हंगामात ग्लेन मॅक्सवेल हा अष्टपैलू खेळाडू मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. त्याचा कौशल्याचा मुंबई इंडियन्सला अचूकतेने उपयोग करून घेता आला नाही. आणि म्हणूनच लिलावाच्या वेळी मॅक्सवेलला खरेदी करण्यात मुंबईने स्वारस्य घेतले नाही. याच हरहुन्नरी मॅक्सवेलची गुणवत्ता ओळखत किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला संघात घेतले. मॅक्सवेलने जबरदस्त खेळ करत पंजाबला सातत्याने विजय मिळवून दिला. मॅक्सवेलचे बूमरँग मुंबईवर चांगलेच उलटले आणि यंदाच्या हंगामात त्यांना बादफेरीत स्थान मिळणेही कठीण झाले आहे. मॅक्सवेलच्या जोडीने डेव्हिड मिलर, मनन व्होरा, अक्षर पटेल, जॉर्ज बेली, संदीप शर्मा सगळेच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाडय़ांवर पंजाबचा विजयरथ घोडदौड करत आहे. बादफेरीत याआधीच स्थान पक्के केले असल्याने पंजाबला प्रयोग करण्याची संधी आहे.
दुसरीकडे गणितीय समीकरणांच्या जोरावर मुंबई इंडियन्सला बादफेरीत जाण्याची संधी मिळू शकते. लेंडल सिमन्स आणि माइक हसी जोडीला सूर गवसल्याने मुंबईची चिंता कमी झाली आहे. रोहित शर्मा आणि कीरेन पोलार्डकडून जबाबदार खेळीची अपेक्षा आहे.
अंबाती रायुडू सामन्याला कलाटणी देणारी खेळी करू शकतो. हरभजन सिंग लौकिकाला साजेशी कामगिरी करताना दिसत आहे. मलिंगाच्या अनुपस्थितीत क्रिश्मर सँटोकीवर मोठी जबाबदारी आहे.