इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) प्रारंभीच्या पाचपैकी चार लढती गमावून गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर पोहोचलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासमोर सोमवारी अव्वलस्थानी असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान राहणार आहे. हा सामना घरच्या प्रेक्षकांसमोर होणार असल्याचा फायदा दिल्लीच्या संघाला मिळणार असला तरी ख्रिस गेलसह सर्व प्रमुख खेळाडूंना लय गवसलेली असल्याने पंजाबचे आव्हान त्यांच्यासाठी अवघडच ठरण्याची चिन्हे आहेत.

आयपीएलमध्ये दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. यंदाच्या मोसमातही चार सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने दिल्लीचा संघ पुन्हा तळात पोहोचला आहे. पंजाबचा सलामीवीर गेल हा पूर्ण लयीत असल्याने त्याला रोखण्याचे आव्हान दिल्लीच्या गोलंदाजांपुढे राहणार आहे. बेंगळूरुने शनिवारी दिल्लीवर दोन षटके राखून मिळवलेल्या विजयात दिल्लीच्या संघ निवडीतील ढिसाळपणाच अधिक कारणीभूत ठरला होता. दिल्लीचा एकमेव विजय हा त्यांनी मुंबई इंडियन्स संघावर मिळवलेला असून त्यात सलामीवीर जेसन रॉय आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांचे योगदान महत्त्वाचे ठरले होते. ऋषभ हा यंदाच्या मोसमातील दिल्लीचा सर्वोत्तम फलंदाज असून त्याने पाच सामन्यांमध्ये २२३ धावा फटकावल्या आहेत. दिल्ली संघाचा कर्णधार गौतम गंभीर आणि तडाखेबंद फलंदाज ग्लेन मॅक्सवेल या दोघांनाही त्यांची लय गवसलेली नसल्याने संघासाठी ती सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरली आहे.

दुसरीकडे गेल आणि राहुलची सलामीची जोडी ही जबरदस्त फॉर्मात आहे. राहुल ट्वेन्टी-२० प्रकारातील धडाकेबाज सलामीवीर म्हणून उदयाला येत आहे. मधल्या फळीत आरोन फिंचमध्ये कोणत्याही आक्रमणाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता असून त्याने ती दाखवून दिली आहे. युवराजला आत्मविश्वास मिळवण्यासाठी अजून काही धावा करण्याची आवश्यकता आहे. रविचंद्रन अश्विन, मोहित शर्मा, बरिंदर सरन, अ‍ॅन्ड्रय़ू टाय आणि मुजीब उर रहमान समर्थपणे गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत.

  • प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स वाहिनी
  • वेळ – रात्री ८ वाजता