कोलकात्याविरुद्ध हरवलेला सूर गवसलेल्या सुरेश रेनाला रोखणे किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी आव्हानात्मक असेल. आयपीएल स्पर्धेत नेहमीच धावांची टांकसाळ उघडणाऱ्या रैनाला यंदा उशिराने सूर गवसला. पंजाबसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्याच्या जोडीला ब्रेंडन मॅक्क्युलम, आरोन फिंच, इशान किशन हे आक्रमक पवित्र्यासाठी ओळखले जाणारे फलंदाज आहेत. गोलंदाजी गुजरातसाठी चिंतेची बाजू आहे. ड्वेन स्मिथऐवजी अँडय़ू टायला संधी मिळणे अपेक्षित आहे. बसिल थम्पीने आपल्या वेगवान गोलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केले आहे. धवल कुलकर्णी, शिवील कौशिक, प्रवीण कुमार, रवींद्र जडेजा यांना धावा रोखण्याबरोबरच बळीही मिळवावे लागतील.

पंजाबसाठी हशीम अमलाने मुंबईविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी साकारली. मात्र तरीही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. अमला, कर्णधार ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, वृद्धिमान साहा यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. फिरकीपटू अक्षर पटेलने चांगली कामगिरी केली आहे. मुंबईविरुद्ध सुमार कामगिरी करणाऱ्या इशांत शर्माला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या जागेसाठी टी. नटराजन आणि मॉट हेन्री शर्यतीत आहेत. अनुरीत सिंगचाही विचार होऊ शकतो. मार्कस स्टॉयनिसकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा आहे.