इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पध्रेत सोमवारी कामगिरीत सातत्य राखण्यात वारंवार अपयशी ठरणारे मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी आत्तापर्यंतचा प्रवास चढ उतारांचा राहिला आहे. त्यांनी सहा लढतीत दोन विजय मिळवले आहेत, तर पंजाबला एकाच विजयावर समाधान मानावे लागले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईला रायझिंग पुणे सुपरजायंट्स, गुजरात लायन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पराभव पत्करावा लागला आहे. शनिवारी झालेल्या लढतीत दिल्लीने विजयासाठी ठेवलेल्या १६५ धावांचा पाठलाग करताना मुंबईला १५४ धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहित (६५) आणि कृणाल पंडय़ा (३६) वगळता इतर फलंदाजांना अपयश आले.

दोन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला घरच्या मैदानावर दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. सलामीवीरांचे अपयश ही मुंबईसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. लेंडल सिमन्सच्या जागी बदली खेळाडू म्हणून मुंबईच्या चमूत दाखल झालेल्या मार्टिन गप्तिलला अपेक्षानुरूप खेळ करता आलेला नाही. जोस बटलरला दिल्लीविरुद्ध अपयश आले. अंबाती रायडू धावा करण्यात माहीर आहे,

परंतु त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता येत नाही. हार्दिक पंडय़ाचा सूर हरवलेला आहे, परंतु त्याचा भाऊ कृणाल फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देत आहे. टीम साऊदी आणि मिचेल मॅक्क्लेघन यांच्यावर मुंंबईच्या गोलंदाजीची मदार आहे.

दुसरीकडे पंजाबच्या कर्णधारपदी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या डेव्हिड मिलरला आपले कौशल्य दाखवता आलेले नाही. मनन वोहरा वगळल्यास पंजाबच्या एकाही खेळाडूला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मिलर, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि वोहरा यांना एकत्रितपणे मोठी खेळी करायला हवी. गोलंदाजीतही त्यांचे पारडे कमकुवतच आहे. त्यामुळे यापुढील प्रत्येक सामना महत्त्वाचा असल्याचे मत मिलरने व्यक्त केले आहे.

 

वेळ : रात्री ८ पासून

प्रक्षेपण : सोनी मॅक्स ,सोनी सिक्स