विराट कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स यांच्या भन्नाट फलंदाजीची आयपीएलमधील सर्व संघांमध्ये आता दहशत पसरली आहे. त्यांचे आक्रमण गोलंदाजांची लय बिघडवते आणि धावांचे इमले सहज पादाक्रांत होतात, हे चित्र तसे परवलीचेच. दुखापतीची तमा न बाळगता प्रेरणादायी संघनायक बनून विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रथ बाद फेरीच्या दिशेने हाकत आहे. बंगळुरूची बुधवारी गाठ पडणार आहे ती दुबळ्या किंग्ज इलेव्हन पंजाबशी. स्वाभाविकपणे उर्वरित दोन सामन्यांपैकी दोन्ही विजय बंगळुरूला आवश्यक आहेत, तर पराजय मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात करण्यासाठी पुरेसा ठरणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात सूर मारून झेल घेण्याच्या प्रयत्नात विराटच्या हाताला दुखापत झाली होती. वैद्यकीय सल्ल्यानंतर त्याने मैदान सोडले होते. मात्र पट्टी बांधून तो त्वरेने क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर परतला होता. मग बंगळुरूच्या फलंदाजीच्या वेळी पुन्हा विराटने आपल्या बेधडक फलंदाजीने छाप पाडली. ख्रिस गेल आणि डी’व्हिलियर्स यांनीसुद्धा त्याला तोलामोलाची साथ दिली. त्यामुळे बंगळुरूचे आव्हान शाबूत राहू शकले.

‘‘माझ्या हाताच्या दुखापतीवर सात-आठ टाके पडू शकतील,’’ असे कोहलीने सामन्यानंतर सांगितले होते. त्यामुळे दुखापतीमुळे विराट बुधवारच्या सामन्यात खेळू शकणार नाही, अशा प्रकारचे ठोकताळे पंजाबचा संघ बांधत असेल, तर त्यांची घोर निराशा होणार आहे. भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहली पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे, असे बंगळुरू संघाचे व्यवस्थापक अविनाश वैद्य यांनी सांगितले आहे.

पंजाबचे आयपीएलमधील आव्हान आधीच संपुष्टात आले असून, त्यांच्यासाठी बंगळुरूविरुद्धचा सामना म्हणजे निव्वळ औपचारिकता असेल. बंगळुरूचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे आणि आणखी एका विजयानिशी त्यांच्या खात्यावर १४ गुण जमा होतील. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील घरच्या मैदानावर तसे बंगळुरूचे पारडे जड असेल. पंजाबचा भरवशाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने दुखापतीमुळे स्पध्रेतून माघार घेतल्यामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.आयपीएलच्या नवव्या अध्यायाचा उत्तरार्ध सुरू आहे. बंगळुरूच्या फलंदाजीचा स्फोटकपणा अधिक गांभीर्याने जाणवू लागला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल असलेल्या विराटच्या खात्यावर १२ सामन्यांत ७५२ धावा जमा असून, बाकीचे फलंदाज त्याच्यापासून बऱ्याच अंतरावर आहे. एका हंगामात तीन शतके झळकावण्याचा ऐतिहासिक पराक्रमसुद्धा आता त्याच्या नावावर आहे. एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या (७३३) नावावर होता. तो आता विराटने मागे टाकला आहे. फलंदाजांसाठी नंदनवन ठरणाऱ्या खेळपट्टीवर कोलकाताविरुद्ध गेल यालासुद्धा सूर गवसला आहे. त्यामुळे मुरली विजयच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाला अधिक सावधपणे रणनीती आखावी लागणार आहे.

सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत डी’व्हिलियर्स (५९७) दुसऱ्या स्थानावर आहे. तर चार अर्धशतके झळकावणाऱ्या लोकेश राहुलच्या खात्यावरसुद्धा ३३२ धावा जमा आहेत. त्यामुळे विराटला तोलामोलाची साथ मिळत आहे.

बंगळुरूच्या फलंदाजीची ताकद अभेद्य असली, तरी गोलंदाजीची चिंता मात्र कायम आहे. महत्त्वाच्या क्षणी हीच उणीव प्रकर्षांने दिसून येते. बंगळुरूच्या आतापर्यंतच्या यशाचे श्रेय हे पूर्णपणे फलंदाजांचे नव्हे, फक्त विराट आणि डी’व्हिलियर्सचे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हरयाणाचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहलनेच फक्त छाप पाडली असून, त्याने ९ सामन्यांत १२ बळी घेतले आहेत. शेन वॉटसनने सर्वाधिक १४ बळी घेतले आहेत. पण त्याची ८.५ धावा, ही सरासरी चिंताजनक आहे. अ‍ॅडम मिलने, मिचेल स्टार्क आणि लेग-स्पिनर सॅम्युअल बद्री यांच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजीचा भार वॉटसन आणि ख्रिस जॉर्डन यांना सांभाळावा लागत आहे.

दुसरीकडे उर्वरित दोन सामने जिंकून आशादायी शेवट करावा, ही योजना पंजाबने आखली आहे. हशिम अमलाने ९६ धावांची दमदार खेळी साकारल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना हार पत्करावी लागली होती. पंजाबची मदार आहे ती कर्णधार मुरलीवर. त्याच्या खात्यावर एकूण ३८७ धावा जमा आहेत. याशिवाय वेगवान गोलंदाज संदीप शर्मा (१३ बळी), मोहित शर्मा (१२ बळी) आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर कुमार (११ बळी) यांच्यावर पंजाबच्या गोलंदाजीची भिस्त आहे.

संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार) , शेन वॉटसन, ए बी डी’व्हिलियर्स, डेव्हिड विसी, अ‍ॅडम मिल्ने, ख्रिस गेल, स्टुअर्ट बिन्नी, केन रिचर्डसन, ट्रेव्हिस हेड, प्रवीण दुबे, विक्रमजित मलिक, इक्बाल अब्दुल्ला, सचिन बेबी, अक्षय कर्णेवार, विकास टोकस, के.एल. राहुल, परवेझ रसूल, अबू नचिम, हर्षल पटेल, केदार जाधव, मनदीप सिंग, सर्फराझ खान, एस. अरविंद, वरुण आरोन, युझवेंद्र चहल, टॅब्रेझ शामसी.

किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), कायले अ‍ॅबॉट, मुरली विजय, मनन व्होरा, मिचेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरीत सिंग, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्क्स स्टॉयनिस, स्वप्निल सिंग, अरमान जाफर, फरहान बेहरादिन, के. सी. करिअप्पा, रिशी धवन, गुरकिराट सिंग मान, निखिल नाईक, शार्दूल ठाकूर.

वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/एचडी.

विराट ‘बॅटमॅन’.. तर ए बी ‘सुपरमॅन’!

विराट कोहली म्हणजे ‘बॅटमॅन’ आहे, तर ए बी डी’व्हिलियर्स म्हणजे ‘सुपरमॅन’ आहे, असे गौरवोद्गार वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने काढले आहेत. आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत कोहली आणि डी’व्हियर्सच्या वादळी फलंदाजीमुळे एक आगळी दहशत निर्माण झाली आहे.

‘‘कोहली आणि डी’व्हिलियर्स हे दोघे जणू ‘बॅटमॅन’ आणि ‘सुपरमॅन’ आहेत. या दोघांचीही फलंदाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. विशेषता कोहली धावांचे इमले रचतो आहे. अशाच प्रकारे धावा काढत राहा. बंगळुरूच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे,’’ असे गेलने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.