पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, आज खातेवाटप जाहीर केलं. अमित शहा यांना गृहमंत्री तर राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय देण्यात आलं आहे. मागच्या सरकारमध्ये सुषमा स्वराज यांच्याकडे हे खातं होतं. यासोबत क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे सोपवणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. नरेंद्र मोदींनी यंदा धक्का देत किरेन रिजिजू यांच्याकडे क्रीडामंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या ५ वर्षांच्या काळात राज्यवर्धन राठोड यांनी क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती. राज्यवर्धन राठोड यांनी क्रीडा मंत्रालयात काही चांगल्या योजना राबवल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या हंगामात राज्यवर्धन राठोड यांच्याकडे क्रीडामंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र मोदींनी रिजिजू यांच्याकडे जबाबदारी सोपवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

यंदा मोदी सरकारमध्ये गौतम गंभीर आणि राज्यवर्धन राठोड असे दोन क्रीडापटू निवडून आले आहेत. रिजिजू यांना राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार देण्याबरोबरच युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय व अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर रिजिजू यांना देण्यात आलेले मंत्रीपद हे काटेरी मुकुट असल्याचे बोलले जात आहे. माजी क्रीडा मंत्री राठोड यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप चांगले काम केले आहे. त्यांनी खेळाडूंना पायाभूत सुविधा मिळवून दिल्या आणि त्याचा सकारात्मक निकालही पाहायला मिळाला होता.